*_आजची माहिती_*
📙 *_लाय डिटेक्टर_* 📙
********************
_नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो._
_या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो._
_श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो._
_लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा