▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*📱संकलन गजानन गोपेवाड 📱*
▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
══════════════════════
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
═══════════════════════
📕 *अॅनिमिया म्हणजे काय ?* 📕
***********************************
तुमच्या चार-पाच मित्रांना बोलवा, त्यांची नखे पाहा, तळहात पाहा. तुमच्या लक्षात येईल की, काहींची नखे गडद गुलाबी, एखाद्याचे फिकट गुलाबी, तर कोणाची पांढुरकी असतील. तसेच तळहातही त्यानुसार लालसर, गुलाबी वा पिवळट दिसतात. असे का दिसते?
नखावर बोटाने दाव दिल्यास ते पांढरट होईल व दाब काढल्यास परत मूळ गुलाबी रंगावर येईल. याचे कारण म्हणजे नखाचा वा तळहाताच्या त्वचेचा रंग हा त्याखाली असणाऱ्या रक्तवाहिन्यांतील रक्तावर अवलंबून असतो. रक्ताचा रंग हा त्यात असणाऱ्या लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन या द्रव्यावर अवलंबून असतो. हिमोग्लोबीनचे व लाल रक्तपेशींचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढा रक्ताचा रंग गडद हिमोग्लोबीन ऑक्सिजनचा पुरवठा सार्या शरीरात करते व शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसाकडे पोहोचवते. या हिमोग्लोबीनचे रक्तातील प्रमाण पुरुषांमध्ये १३ ते १५ ग्रॅम प्रति १०० मिली, तर स्त्रियांमध्ये ११ ते १४ ग्रॅम प्रति १०० मिलीपेक्षा कमी झाल्यास त्याला रक्तक्षय वा अॅनिमिया असे म्हणतात. यात नखे व त्वचा पांढुरकी दिसते. जीभही फिकट रंगाची दिसते, थकवा लवकर येतो, उत्साह राहत नाही, कधी कधी चक्कर येते, छातीत धडधडते.
आहारामध्ये लोहाचा, प्रथिनांचा वा 'क' जीवनसत्त्वाचा अभाव, काही औषधांमुळे वा रोगांमध्ये लाल पेशींचा होणारा अतिरिक्त नाश; तसेच मूळव्याध, रक्ताच्या उलट्या अपघातातील रक्तस्त्राव अशा अनेक कारणांमुळे रक्तक्षय होतो. अंकुश कृमींची लागण झाली, तरी आतड्यात सूक्ष्म रक्तस्त्राव होऊन अनेमिया होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे व अपुऱ्या पोषणामुळे अनेमिया होतो. गरोदर स्त्रियांमध्ये तर ६५% नातांना अनेमिया असतो. अनेमिया टाळण्यासाठी, ज्यामुळे तो झाला असेल त्या कारणावर उपचार होणे गरजेचे असते. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा मुबलक वापर, प्रथिनांचा समावेश यामुळे हिमोग्लोबीनचे रक्तातील प्रमाण वाढते. लोहयुक्त गोळ्या घेतल्याने सुद्धा अॅनेमिया बरा होतो.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═══════════════════════
*📱अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य 📱*
▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
═══════════════════════
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा