*_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*
🤔 *_कुतूहल_* 🤔
🎯 *_जादूई चौरसांचा इतिहास_*
***************************
_‘जादूचे बेरीज चौरस’ या संकल्पनेबाबत चिनी संस्कृतीतील आख्यायिका अशी : इ.स.पूर्व काळात यलो नदीच्या पुरामुळे विवंचनेत असलेल्या राजा यू लिंगला पाठीवर १ ते ९ ठिपक्यांची रांगोळी असलेले शुभशकुनी कासव दिसले. सहज चाळा म्हणून त्याने अंकांची बेरीज केली. गंमत म्हणजे, तिन्ही स्तंभ, तिन्ही रांगा आणि दोन्ही कर्ण यांतल्या अंकांची बेरीज १५ अशी होती. या चौरसाला त्याने ‘लो-शू’ (नदीवरचे भूर्जपत्र) असे नाव दिले. मात्र इसवी सन पूर्व काळातीलच चीनच्या फू-ही यांच्याकडे जादूच्या चौरसांच्या शोधाचे जनकत्व जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ‘दा-दाई-लिजी’ या पुस्तकात जादूच्या चौरसांचा उल्लेख आढळतो. या चौरसांचा प्रवास चीनमधून भारत, अरब देश, युरोप, जपान असा झाला असावा._
_भारतात इसवी सनाच्या पहिल्या शतकात ४ x ४ चा बेरीज चौरस नागार्जुन यांनी बनवलेला आढळतो. खजुराहोच्या पार्श्वनाथ मंदिरातल्या शिलालेखातील चौरस (बेरीज ३४) जगप्रसिद्ध आहे. वराहमिहिरांच्या ‘बृहत्संहिते’मध्ये, तर वृंद यांच्या ‘सिद्धयोग’ ग्रंथात यांचा उपयोग आढळतो. परंतु भारतात गणिताच्या पुस्तकात जादूच्या चौरसांच्या रीती देण्याचे श्रेय ठक्कुरा फेरू (इ.स. १३१५) यांना जाते. नारायण पंडितांनी ‘गणितकौमुदी’ ग्रंथात (इ.स. १३५६) जादूच्या चौरसांचे अभ्यासपूर्ण विवेचन करताना अंकगणिती श्रेढी आणि जादूचा चौरस यांमधला संबंधही मांडला._
_अरब देशांमध्ये नवव्या-दहाव्या शतकात गणिताच्या माध्यमातून हे चौरस जन्मकुंडल्या बनविण्यासाठी उगम पावले. पुढे इस्लामी गणितींनी यांची नियमावलीच तयार केली. युरोपमध्ये चौदाव्या शतकात मॉस्कोप्युलसने ४ ७ ४ जादूचा चौरस बनवण्याची सोपी युक्ती शोधली. पुढे जर्मन डॉ. कॉर्नेलिअस अग्रिप्पा यांनी ग्रहांशी संबंध असलेले सात चौरस बनवले. सन १५१४ मध्ये शिल्पकार अलब्रेख्त ड्यूररने ‘मेलॅन्कोलिया’ या जगप्रसिद्ध शिल्पात ४ ७ ४ बेरजेचा चौरस कोरला. सन १७३६ मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी १६ ७ १६ चौरस निर्माण केला. १९ व्या शतकात फ्रॉस्ट या ब्रिटिश मिशनऱ्याने एका चौरसाला ‘नाशिक चौरस’ असे नाव दिले. विसाव्या शतकात ली सालो यांनी बरेच मनोरंजक चौरस तयार केले. हेन्री डुडेनी यांनी १ खेरीज इतर मूळ संख्या घेऊन सर्वात कमी १११ बेरजेचा चौरस तयार केला._
_सध्याही मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असलेल्या या जादूई चौरसांचे जनमानसावर गारूड होते आणि ते कायम राहील._
🖊 *_नीलिमा मोकाशी_*
office@mavipamumbai.org
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_📡 जय विज्ञान 🔬_*
*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १५ मार्च २०२१_*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा