*_आजची माहिती_*
*_📙शरीराला दुखापत झाल्यास सूज का येते📙_*
****************************************
_खेळताना तुम्ही पडता. कधी कधी डोक्यावर काहीतरी आपटते. कधी मारामारीत हातापायाला लागते. कालांतराने लक्षात येते की ज्या ठिकाणी लागले आहे तेथे सूज आलेली असते. त्या भागाला हात लावला तर गरम लागते. त्या जागी दुखते, त्या भागात हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत व ती जागा लालसर होते. त्यालाच इन्फ्लेमेशन किंवा दाह असे म्हणतात. लॅटिन 'इन्फ्लॅमेर' 'जळणे' या शब्दांपासून इन्फ्लॅमेशन हा शब्द आला आहे. कोणत्याही उतींना (पेशींचा समूह) इजा झाली, तर शरीर एका विशिष्ट पद्धतीने प्रतिसाद देते. यात उतींमधील पेशी, रक्तवाहिन्या, रक्तातील पेशी या सर्वांच्या एकत्रित सुसंघटित क्रियांमुळे झालेली इजा भरून येण्यासाठी मदत होते._
_जखम व इजा झालेल्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. परिणामी तो भाग लालसर दिसतो व तेथील तापमानही वाढते. प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांच्या आवरणातून रक्तातील द्रव, प्रथिने व पांढऱ्या पेशी जखम झालेल्या ठिकाणी सोडल्या जातात. त्यामुळे त्या भागात सूज येते. जखम झाल्यावर त्या भागातील पेशीतून बाहेर पडलेल्या रासायनिक पदार्थाच्या क्रियेमुळे तसेच सूज आल्याने त्या भागाच्या उतींवर येणार्या दाबामुळे वेदना होतात. सूज आल्याने व वेदना होत असल्याने त्या भागाच्या हालचाली आपोआपच कमी केल्या जातात._
_जखम व मार सोडून जीवाणू, विषाणू संसर्ग तसेच जंतूंनी शरीरात सोडलेल्या विषांच्या परिणामामुळेही दाहाची प्रक्रिया होते. अॅलर्जीमुळे तसेच उष्णता, थंडी अशा गोष्टींमुळेही दाह होतो. दाह होणे ही शरीराची संरक्षक अशी प्रतिसादात्मक क्रिया आहे. दाहाच्या प्रक्रियेत जंतूंचा नायनाट केला जातो. मृतपेशींचे पचन केले जाते व जखम भरून येण्याला मदत होते. जखम झाल्यावर सूज का येते, हे तुमच्या लक्षात आले असेलच._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*
_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा