बुधवार, ७ एप्रिल, २०२१

स्वासोच्छवास कसा चालतो

 *_आजची माहिती_*


📙 *_श्वासोच्छवास कसा चालतो ?_* 📙 

*********************************


_श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणजे माणूस मरतो श्वास घेणे व तो सोडणे हे कार्य व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अव्याहतपणे चालू असते. श्वास घेतल्याने हवा नाकावाटे फुप्फुसात जाते. तेथे हवेतील प्राणवायू रक्तात मिसळला जातो व रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू हवेत सोडला जातो. याखेरीज पाण्याची वाफ, अल्कोहोलसारखे विषारी पदार्थ देखील हवेत टाकले जातात. श्वास सोडल्यावर ही हवा नाकावाटे बाहेर सोडली जाते._

     _श्वास घेताना छातीच्या खाली असलेल्या पडद्यावजा स्नायूने फुप्फुसे खालच्या बाजूला ओढली जातात. तसेच फासळ्यांच्या व मानेच्या स्नायूंमुळे ती बाजूंनी व वरच्या दिशेने ताणली जातात. त्यामुळे आतमध्ये दाब कमी होऊन नाकावाटे हवा फुप्फुसात ओढली जाते. तेथे श्वसनाचे कार्य पूर्ण झाल्यावर पडदा फुफ्फुसांना वर ढकलतो, तर फासळ्यांमधील स्नायू व मानेचे स्नायू फुप्फुसांवर दाब आणतात. त्यामुळे फुप्फुसातील हवा आतील दाब वाढल्याने नाकावाटे बाहेर सोडली जाते. रक्तातील प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूंच्या प्रमाणावर श्वसनाचे नियंत्रण होत असते. मेंदूतील श्वसनाचे केंद्र या क्रियांवर नियंत्रण करते. श्वसनावर काही प्रमाणात ऐच्छिक नियंत्रणही असते. त्यामुळेच आपण स्वतःहून श्वास काही काळ रोखून ठेऊ शकतो; पण कालांतराने स्वयंप्रेरित नियंत्रणाच्या आधारे श्वसन आपोआप चालु होते. पडद्याचे वर खाली होणे जन्माला येण्याच्या क्षणापासून अखेरपर्यंत चालू राहते !सात मिनिटांच्या वर श्वासोच्छ्वास बंद पडल्याने व्यक्ती मरण पावते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...