*_आजची माहिती_*
*_📙 समतोल आहार म्हणजे काय ? 📙_*
**********************************
_आपला आहार समतोल असावा, चौरस असावा हा उपदेश ऐकून आपले कान किटले असतील. 'समतोल' म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे. समतोल आहार म्हणजे काय ? हे समजण्यासाठी प्रथम आहारात कोणते घटक असणे आवश्यक असते, हे आपण पाहू. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी हे अन्नातील सहा प्रमुख घटक होत._
_कार्बोदके शरीराला ऊर्जा पुरवितात. प्रथिने शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या क्रियाप्रक्रियांना मदत होते. अ, ब, क, ड, इ तसेच के ही जीवनसत्त्वे आपल्याला अत्यंत अल्प प्रमाणात लागतात. पण ती मिळाली नाही तर अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराइड सारखे हे क्षारही जगण्यासाठी आवश्यक असतात. पाणी हे तर साक्षात जीवनच ! शरीराच्या वचनांपैकी सुमारे ६४% वजन पाण्याचेच असते. हे सर्व घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण, रातांधळेपणा, मुडदूस, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, अशक्तपणा, गलगंड, रक्तक्षय इ. कमी पोषणामुळे होणारे आजार वा लठ्ठपणासारखे अतिपोषणामुळे होणारे आजार होऊ शकतात. हे टाळावयाचे असल्यास समतोल आहार घेणे आवश्यक ठरेल. ज्या आहारात वर वर्णन केलेले सर्व घटक योग्य प्रमाणात असतील त्यास समतोल आहार असे म्हणतात. योग्य प्रमाणात म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली ऊर्जा त्यातून मिळाली पाहिजे. जीवनसत्वे, क्षार, पाणी मिळाले पाहिजे. खेरीज अनपेक्षित वा आकस्मित प्रसंगासाठी जसे आजार, अपघात यासाठी अतिरिक्त पोषणही त्याद्वारे मिळायला हवे. एकूण ऊर्जेपैकी ६५ ते ७०% कार्बोदकातून, १५ ते २५ % स्निग्ध पदार्थांतून तर ५ ते १५% प्रथिनांपासून मिळावी._
_समतोल आहाराचा आपण अंगीकार केला तर निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरू राहील. आपण रोजचा आपला आहार बघितला तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी अशा कार्बोदके अधिक असलेल्या अन्नपदार्थांसोबत डाळी, भाजीपाला, तेल, तूप या गोष्टी; तसेच मांस, मासे, दूध, अंडी असे प्राणीज पदार्थ आपण वापरात आणत असतो. हे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे परिपूर्ण नसतात. परंतु यातील दोन तीन पदार्थ एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदाहरणार्थ नुसत्या भाताऐवजी वरण-भात डाळ-तांदळाची खिचडी वरण-भाकरी इडली-सांबार इत्यादी पदार्थांमुळे आहार परिपूर्ण होतो_
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*
_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा