*_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*
🤔 *_कुतूहल_* 🤔
🎯 *_गणितोत्सव दिवस_*
********************
_नवीन वर्षांची दिनदर्शिका आली की त्यात आपले सण केव्हा आहेत हे आपण बघतो. त्याचप्रमाणे काही गणिती दिवसदेखील साजरे केले जातात. त्यातील निवडक आज पाहू._
_अलौकिक गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा १२५ वा जन्मदिवस २२ डिसेंबर २०१२ रोजी साजरा करताना, तो दिवस भारताचा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून घोषित केला गेला. जेमतेम ३२ वर्षांच्या आयुष्यात तसेच प्रतिकूल आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीत त्यांनी केलेले अचंबित करणारे गणिती कार्य आणि नि:स्पृह चरित्र अशा पैलूंवर त्या दिवशी युवा पिढीला प्रेरणा देणारी व्याख्याने, परिसंवाद असे कार्यक्रम देशभर घेतले जातात तसेच गणिती खेळ, कोडी व अनेक रंजक उपक्रमही आयोजित केले जातात_
_भारतात २९ जून हा ‘राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस’ म्हणून मानला जातो. तो आहे प्रा. प्रसंताचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस, ज्यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी संख्याशास्त्राचे शिक्षण, संशोधन आणि उपयोजन याचा पाया भारतात रचला. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) स्थापना करून तिला जागतिक दर्जा मिळवून दिला. संयुक्त राष्ट्रांकडून दर पाच वर्षांनी एक संकल्पसूत्र घेऊन २० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक संख्याशास्त्र दिवस’ साजरा केला जातो. त्याप्रमाणे २०१०, २०१५ आणि २०२० साली अनुक्रमे ‘शासकीय सांख्यिकी व्यवस्थेचे सुयश’, ‘सुव्यवस्थित आधारसामग्री, उच्चतर आयुष्य’ आणि ‘विश्वसनीय सांख्यिकी माहितीने जग जोडावे’ अशी संकल्पसूत्रे होती._
_‘पाय’चे स्थूलमानाने मूल्य ३.१४ असे आहे. महिना/ दिवस/ वर्ष या तऱ्हेने दिनांक लिहिण्याच्या पद्धतीमुळे अमेरिकेत व इतर काही देशांत १४ मार्च हा ‘पाय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपण दिनांक दिवस/महिना/वर्ष असे लिहीत असल्यामुळे २२ जुलै हा आपला ‘पाय दिवस’ होऊ शकतो, कारण पायचे मूल्य स्थूलमानाने २२/७ असेही लिहिले जाते._
_काही दिवस संख्यांच्या गणिती गुणधर्मामुळे साजरे होतात जसे की, फिबोनासी संख्यांचा क्रम १, १, २, ३, ५,.. असा आहे (मागच्या २ संख्यांची बेरीज करून नवीन संख्या मिळते) तरी त्यातील पहिल्या ४ संख्या अमेरिकेच्या महिना/दिवस दिनांक पद्धतीप्रमाणे ११/२३ म्हणजे २३ नोव्हेंबर हा ‘फिबोनासी दिवस’ निर्माण करतात. कधी कधी येणारा ‘पायथागोरस प्रमेय दिवस’ हा ‘अ२ + ब२ = क२’ सूत्रात बसणाऱ्या संख्यांनी निर्माण होतो. उदाहरणार्थ, दिनांक १५ ऑगस्ट २०१७; कारण १५२ + ८२ = १७२ किंवा १६ डिसेंबर २०२० (वर्षांचे शेवटचे दोन अंक). तेव्हा हे दिवस आणि ‘ई-दिवस’, ‘वर्गमूळ दिवस’ यांसारखे इतर गणिती दिवस शोधून साजरे करा._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_📡 जय विज्ञान 🔬_*
*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- ११ मार्च २०२१_*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा