*_आजची माहिती_*
📙 *_लोकर_* 📙
*************
_थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच._
_लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते._
_कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते. लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे._
_लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा