▬▬▬▬▬❚❂❚
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *बाळ का रडते ?* 📕
बाळाचे रडणे ऐकले की आपल्याला कसेसेच होते. लागलीच, ते का बरे रडत असेल याचा शोध सुरू होतो. ताईपासून माईपर्यंत आणि दाजीपासून आजीपर्यंत सारेच आपापल्या परीने उपाय सुचवायला लागतात. बाळाला बोलता येत नसल्याने तर हा प्रयत्न जास्तच गंभीर होतो. बाळाची आई नवखी असेल, तर मग विचरायलाच नको, तिची अगदी त्रेधातिरपीट उडून जाते. कधी दूध पाजल्यावर, कधी कडेवर घेतल्यावर, तर कधी थोपटल्यावर ते शांत होते व 'बघ मी सांगत होतो की नाही, असे अभिमानाचे उद्गारही ऐकायला मिळतात. गंमत म्हणजे हे उपाय मूल दुसऱ्यांदा रडल्यावरही वापरले जातात व त्याचा काही उपयोग होत नाही. यावरून एक लक्षात येईल की, मूल रडण्याची अनेक कारणे आहेत व सर्व प्रकारचे रडणे थांबवण्यासाठी कोणताही एकमेव असा रामबाण उपाय अस्तित्वात नाही.
रडणे ही एक नैसर्गिक क्रिया असून तिचा उपयोग लक्ष वेधून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी, निषेध नोंदवण्यासाठी वा प्रतिकार करण्यासाठी होऊ शकतो. मूल रडण्याची विविध कारणे आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागणे. उपाशी असलेले मूल रडते व दूध मिळताच गप्प बसते. चड्डीत शी वा शू केल्याने ओलेपणा जाणवतो व त्यामुळेही मूल रडते. अशा वेळी मुलाला कोरडे केल्यास ते रडायचे थांबते. वयाचदा माता दूध पाजल्यावर बाळाच्या पोटातील ढेकर काढत नाहीत. त्यामुळे पोटात हवा धरून बाळाचे पोट दुखते व ते रडते. यासाठी दूध पाजल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन हलके हलके थोपटावे, म्हणजे ढेकर बाहेर पडेल. कधी कधी आजारामुळे वाळाला वेदना होतात व ते रडते. अशा वेळी त्या त्या आजारावर उपचार करणे अगत्याचे ठरते. खूप घट्ट कपडे घातल्याने बाळाला त्रास होतो व ते रडते.
९५ टक्के वेळा वाळ रडण्याचे कारण हे सामान्य स्वरूपाचे असते. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. रडण्यासोबत धाप लागत असेल, खोकला असेल, खूप ताप असेल, खूप संडास उलट्या होत असतील तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे अगत्याचे ठरेल. एक महत्त्वाची गोष्ट मूल रडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याला जवळ घेऊन प्रेम द्यावे, ही त्याची अपेक्षा असते. साहजिकच आईचा नुसता उबदार स्पर्श झाला, तरी ते रडायचे थांवते!
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═════════════
संकलन गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा