गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

ज्वाला नेहमी का उफाळते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

🔥 *ज्वाला नेहमी वरतीच का उफाळते ?*🔥

************************************

केला जरी पोत बळेचि खालेज्वाला तरी ते वरती उफाळे वामन पंडित म्हणून गेले आहेत. अर्थात, त्यांचं हे वचन म्हणजे आपल्याला नेहमी येणाऱ्या अनुभवाचंच नवनीत आहे. आपण नेहमी पाहतो, की पेटती ज्योत वरच्या दिशेनेच उडत असते. साधी पेटलेली काडी घेतली आणि हातात उलटी धरली तरी त्याची ज्योत वरच्या दिशेनेच उफाळून येते. बोटं भाजून काढते. साहजिकच हे असं का होतं, हा सवाल त्या ज्योतीसारखाच मनात उफाळून येतो.

पोत म्हणजेच मशालीचा पलिता जेव्हा पेटतो तेव्हा त्या पलित्याचं कापडी टोक जरी पेटल्यासारखं वाटलं तरी ते जळत नाही. अगदी आपल्या नेहमीच्या ओळखीची मेणबत्ती घेतली किंवा निरांजनातली वात, तर ती कापसाची वात काही जळत नाही. जळतं ते त्या कापसाला चिकटलेलं मेण. पलित्यात असलेलं तेल. ते इंधन जळतं. अर्थात, असं इंधन नेहमीच तेलासारखं द्रवरूप असतं असं नाही. तुपासारखं अर्धद्रवरूपात किंवा मेणासारखं घनरूपातही ते असू शकतं पण ते मुळात कोणत्याही रूपात असलं तरी त्याला उष्णता मिळाली, ते गरम झालं की प्रथम द्रवरूपात आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की वायुरूपात बदलतं. पाणी कसं घनरूपात म्हणजे बर्फाच्या खड्यात असतं. त्याला उष्णता मिळाली की त्याचं वाहत्या पाण्यात रूपांतर होतं आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की त्याची वाफ होते. सगळ्याच पदार्थांची अशी स्थिती असते पण काही पदार्थ असे असतात, की ते वायुरूपात गेल्यावर त्यांना आणखी उष्णता मिळाली, की ते पेट घेऊ शकतात. इंधन अशा ज्वालाग्राही पदार्थांचंच असतं.


मेणबत्तीतलं मेण गरम झालं की वितळतं. द्रवरूपातलं ते मेण मग केषाकर्षणापायी त्या वातीवरून तिच्या टोकापर्यंत पोहोचतं. तोपर्यंत आणखी गरम होत ते वायुरूप धारण करतं. ते वायूच मग पेट घेतात. जळत राहतात. अर्थात, वायू असल्यामुळं ते हलके असतात आणि त्यामुळंच मग ते वरवर जात राहतात.


वायू नेहमीच वरवर जात राहतात. पाण्याची वाफही अशीच वरवर जात राहते पण वाफ ज्वालाग्राही नसल्यामुळं ती तशी नुसतीच वर जाते. आपल्याला दिसतेही पण पेटलेले वायू वरवर जातात तेव्हा ती ज्योत किंवा ज्वालाच वरवर जात असल्यासारखी दिसते. ती मेणबत्ती उलटी धरली तरी पेटते. वायू वरवरच जात राहतात. वामन पंडितांच्या उक्तीचा दृष्टान्त देतात.


हे होतं ते गुरुत्वाकर्षणाच्या बलापोटीच. त्या बलापायी इतर वस्तू जरी जमिनीच्या दिशेनं येत असल्या, तरी वायू हलके असल्यामुळं ते सहजगत्या वरच्या दिशेनं जात राहतात. जर गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसेल तर ते वर जाणार नाहीत. गुरुत्वाकर्षण शून्यावर कधीच जात नाही पण ते अत्यल्प होऊ शकतं. अंतराळयानात ते असंच घसरतं. त्या यानात मेणबत्ती पेटवली तर तिची ज्योत तिथल्या तिथंच पसरत राहते. पाणी पसरून त्याचं थारोळं व्हावं तशीच. तिथं मग वामन पंडितांच्या उक्तीचा प्रत्यय येत नाही. तिथं केला जरी पोत सहजची खालेज्वाला तरी ते खालतीच खेळे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...