मंगळवार, १३ जुलै, २०२१

एक आठवण शिवरायांची

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

********************************

     *१३ जुलै इ.स.१६६०*

*बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन*

********************************


स्मृतिदिन - १३ जुलै १६६०


पावनखिंड ! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे !


किल्ले पन्हाळगड १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा. गुरुवार रात्री १० वाजायच्या आसपास ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या संगे हिरडस मावळांतील सहाशे मावळे आणि सोबत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ठरलेल्या मार्गाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी पन्हाळ्याहून हेरांनी शोधलेल्या मार्गाने निघाले. अंधारलेल्या मार्गाने हेर पुढे आणि त्या मागोमाग सर्व.सोबत एक पालखी होतीच.


ऐन वेढ्यात शिरताच सर्वाँचेच काळीज धडधडू लागले. वेढ्याची हद्द संपली अन पालखी झपाट्याने पुढे पुढे धावत होती.


अन् घात झाला ! जौहरच्या हेरांनी पाहिलेच !


पण मावळ्यांनी राजांची पालखी जोरात पळवायला सुरवात केली. काही अतंर पळाल्यावर मावळे थांबले. रिकामी पालखी पुढे आली. महाराजांप्रमाणेच पोशाख केलेला एक मावळा पुढे आला. त्या मर्द मावळ्याचे नाव 'शिवा काशिद' हा जातीने न्हावी होता.


नवी पालखी सरळ मार्गाने विशाळगडाकडे निघाली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी निवडक मावळ्यांसह आडरानात घूसली.


"शिवाजी भाग गया" ही बातमी सिद्दी जौहरच्या छावणीत धडकली. अन राजांचा पाठलाग सूरु झाला. विशालगडाकडे मसूदची फौज निघाली. बराच पाठलाग केल्यावर पंधरा वीस मावळे एक पालखी पळवीत असताना दिसले. पालखी अडवली गेली. पालखीत शिवाजीराजे सापडले.


मसूदला आनंद झाला. मसूद आनंदाने पालखीसह जौहरच्या छावणीत पोहोचला. पालखीतून राजे उतरले. जौहर निरखून राजांना पाहू लागला. अन् त्याची खात्री झाली, हा शिवाजी नाही.


राजांची चौकशी केल्यावर कळलं हा शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा दुसराच 'शिवा' नावाचा न्हावी आहे.


चिडून संतापून मसूद पुन्हा राजांच्या पाठलागावर निघाला. एवढ्या वेळात महाराज बरेच दूर गेले होते. पहाट झाली होती.


आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. दि. १३ जुलै १६६०. अजून पाच कोस जायचे होते. मावळे पालखी पळवायची शिकस्त करत होतेच. मावळे, बाजीप्रभू आणि महाराज गजापूरच्या खिंडीत पोहचले. आणि आलाच मसूद. आता क्षणभरही थांबणे घातक होते.


बाजींनी राजांना कळवळून विनविले, "तुम्ही थांबू नका. गनीम जवळ येतोय. मी इथे खिंडीत थांबतो. एकालाही खिंड चढू देणार नाही. तुम्ही जा ! गडावर जाताच तोफांचे आवाज करा ! तोंपावेतो गनिमाला येऊ देत नाही !"


'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हि म्हण बहुधा तेव्हाच बनली असावी. निम्मे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे निघाले. खिंडीत बाजींसोबत मावळ्यांनी मसूदच्या फौजेला रोखले.


पन्हाळ्याहून निघून सात प्रहर म्हणजे २१ तास झाले होते. बाजींनी शौर्याने खिंड लढवित ठेवली. महाराजांनी विशाळगडाखालील जसवंत सिंह आणि सुर्यराव यांचा प्रतिकार मोडीत विशाळगडावर धाव घेतली.


घोडखिंडीत बाजीप्रभू , फूलाजीप्रभू आणि मावळे तोफांच्या आवाजाची वाट पाहत होते. एवढ्यात...


तोफांचा आवाज कडाडला. तीन तोफांचे आवाज झाले. एवढ्यांत घात झाला. बाजींवर शत्रूचा घाव पडला. घळकन् रक्ताचा लोंढा फुटला. बाजींची मुर्ती कोसळली


गजापूरची खिंड पावन झाली ! पावनखिंड !!


फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना । 

तसा चित्तीं ध्यातो शिवा काशिदांना ॥

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

********************************

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...