सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

मृगजळ का दिसतात


══════════════════════

   *संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मृगजळ का दिसत ?*  

*****************************

मृगजळ म्हणजे एक चमत्कार, अशी सर्वसाधारण समजूत असली तरी तो आहे केवळ एक प्रकाशीय अविष्कार. प्रकाशाच्या एका गुणधर्मापोटी तो साकार होतो. प्रकाशकिरणांचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. घन माध्यमांमध्ये तो कमी असतो. विरळ माध्यमात तो जास्त असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त असतो. माळरानावर आपण सुसाट धावू शकतो; पण घनदाट जंगलातून आपल्याला त्याच वेगाने पळता येत नाही. आपला वेग आपोआपच कमी होतो. त्यातलाच हा प्रकार.


 त्यामुळेच एका माध्यमातुन दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशकिरणांची दिशा बदलते. ते वागतात. कमी वेग असलेल्या माध्यमाच्या दिशेने ते वळतात. यालाच प्रकाशाचे वक्रीभवन किंवा अपवर्तन असे म्हणतात. माध्यमांच्या घनतेनुसार या वक्रीभवनाची मात्राही वेगवेगळी असते.

मृगजळ आपल्याला दिसते ते सहसा अतिशय तापलेल्या रस्त्यावरून जाताना. त्या रस्त्यावर दूरवर एखादे पाण्याने भरलेले तळे असल्यासारखे आपल्याला दिसते. पण त्याच्या जवळ जावे, ते तळे आहे असे वाटते. तिथे पोहोचले तर ते तळे गायब होते. तिथे तसाच तापलेला डांबरी रस्ता असल्याचे आपल्याला दिसते.


 जेव्हा तो रस्ता अतिशय तापलेला असतो तेव्हा त्या रस्त्याच्या निकट असलेल्या हवेच्या थराचं तापमानही चढतं. हवा तापली की विरळ होते. त्याच्यावर असलेल्या तुलनेने थंड असलेल्या हवेच्या थराची घनता जास्त असते. ती दाट असते. त्यामुळे आकाशातून आलेल्या सूर्याप्रकाशाचा किरण प्रथम त्या हवेच्या दाट थरातून जातो. तिथून जेव्हा तो खालच्या तापलेल्या विरळ थरात जातो तेव्हा त्याचा वेग अर्थातच वाढतो आणि त्याची व त्याची दिशा बदलते. ती वरच्या दाट थराच्या म्हणजे कमी वेग असलेल्या माध्यमांच्या दिशेने वळते. तो किरण आपल्या डोळ्यांना भिडतो तेव्हा त्या रस्त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात न उमटता वर असलेल्या आकाशाची प्रतिमा तिथे साकार होते. आकाश तर वरच्या बाजूला आहे. मग ते आपल्याला कसे दिसेल, असे वाटल्याने ते त्याचे प्रतिबिंब आहे असा आपला समज होतो. तसे ते प्रतिबिंब जर तिथे पाणी असेल तरच आपल्याला दिसेल, अशा समजुतीने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन जिथुन झाले त्या ठिकाणी पाण्याचा साठा असल्याचा भास आपल्याला होतो. अशा प्रकारच्या हवेच्या निरनिराळ्या थरात जेव्हा घनता वेगवेगळी असते तेव्हा तेव्हा हा वक्रीभवनाचा खेळ साकार होतो. त्यापायीच समुद्राजवळच्या एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभे असतो तेव्हाही आपल्याला आकाशात होडी चालल्यासारखी दिसते. वास्तविक ती होडी समुद्राच्या पाण्यात विहरत असते; पण वक्रीभवनापायी तिची ती आभासी प्रतिमा उमटते आकाशाच्या पडद्यावर. तेही मृगजळच.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...