गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान समुद्रकिनारा वर लाटा का फुटतात


══════════════════════

   संकलन ,

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌊 *समुद्रकिनाऱ्यावर लाटा का फुटतात ?* 

***********************************

मोसमी पावसाची चाहूल लागते ती समुद्राच्या खवळण्यामुळे. समुद्राचं पाणी गढुळ झाल्यासारखं करडा रंग धारण करतं. त्याच्यात मोठमोठ्या लाटा उठतात. त्या वेगाने किनाऱ्याकडे धावत सुटतात. तिथं पोहोचताच त्या अकस्मात राक्षसी आकार धारण करतात आणि टक्कर दिल्यासारख्या किनाऱ्याच्या बांधावर आपटतात. फेसाळतात. त्यांचे तुषार दूरवर फेकले जातात. त्या तुषारांमध्ये न्हाऊन निघण्यासाठी मग रसिक मंडळी चौपाटीच्या बांधावर गर्दी करतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईत हे दृश्य हमखास बघायला मिळते. उन्हाळ्याच्या तलाखीनं त्रासलेल्या मंडळींना त्या फुटणाऱ्या लाटांनी चिंब भिजण्याचं सुख तर मिळतंच पण त्यांना तसं भिजताना पाहणाऱ्यांच्या मनावरही सुखाची साय धरते. या सार्‍या सुखसोहळ्यात एका प्रश्नाचा भुंगा मनाला पोखरत राहतो. किनाऱ्यावर आलेल्या लाटा अकस्मात मोठय़ा कशा होतात ? आणि त्या फुटतात तरी कशाला ?


 किनाऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या लाटांची उंची केवळ समुद्र खवळलेला असतानाच वाढते असं नाही. तसंच त्यांचं फुटणं समुद्र शांत असतानाही दिसून येतं. त्यामुळे लाटांमधल्या किनाऱ्याजवळच्या या बदलाला समुद्राचं खवळणं कारणीभूत नाही. त्याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मुळात या लाटा तयार कशा होतात किनाऱ्याकडे का धावतात याचा विचार करायला हवा.


 लाटा नेहमी किनाऱ्याकडेच धावतात येही संपूर्णपणे खरं नाही. ओहोटीच्या वेळी लाटा किनाऱ्यापासून दुरही जाताना दिसतात. तसेच परतणाऱ्या लाटाही किनाऱ्याचा निरोप घेताना दिसतात. त्या आपला आकारही बदलत नाहीत की फुटतही नाहीत. मध्य समुद्रात उठणाऱ्या लाटांचं वर्तनच तसं होत असतं.


 भर समुद्रातल्या पाण्याला जोराने वाहणारा वारा घुसळून काढतो. त्यामुळे ते पाणी तिथल्या तिथे वरखाली नाचत राहते. ते तसं पुढं सरकत नाही. पण एका जागी नाचणाऱ्या पाण्याच्या थराचा प्रभाव त्याच्या पुढच्या थरावर पडतो. मग ते नाचायला लागते. त्यामुळे ती लाट पुढे पुढे सरकल्यासारखी होते. जेव्हा ही लाट तयार होते तेव्हा त्या नाचणाऱ्या पाण्याच्या थराला खालच्या बाजूला अडवणारी जमीन नसते. कारण तिथे पाण्याला चांगलीच खोली असते. वारा कितीही वेगाने वाहत असला तरी पाणी जितके उंच उडू शकते तितकंच खोलवरही नाचू शकते. पण हीच लाट जेव्हा किनाऱ्याच्या जवळ येते तेव्हा तिथल्या पाण्याला तितकी खोली नसते. ते उथळ असते. खालच्या जमिनीचा तिला विरोध होतो. ती जमीन मग त्या नाचणाऱ्या पाण्याला वरच्या दिशेने ढकलत राहते. त्यामुळे मग लाटांची उंची वाढते. किनाऱ्याजवळची पाण्याखालची जमीन कशी आहे ती खडकाळ आहे तिला जोमदार चढाव आहे की नाही यावरही लाटेची उंची ठरते. या चढावापोटीच मग लाट उलटी फिरवली जाते. तिच्या लयीत फरक पडतो आणि ती फुटते. एका लयीत नाचणारे पाणी वेड्यावाकड्या दिशांनी फेकले जाते. त्यामुळेच मग ते फेसाळते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...