══════════════════════
@ संकलन @
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *पाण्यात ठेवलेली पेन्सिल मोडल्यासारखी का दिसते ?*
***********************************
कोणतीही वस्तू आपल्याला दिसते कशी ? म्हणजे तशी ती आपण डोळ्यांनीच पाहतो ; पण डोळ्यांमध्ये तरी तिची प्रतिमा उमटते कशी ? आपल्याला अंधारात कोणतीही वस्तू दिसत नाही. अगदी आपल्या हाताचं बोटही दिसत नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज भासते. दिव्यासारख्या वस्तूला स्वतःचा प्रकाश असतो. आकाशातल्या ताऱ्यांनाही; पण इतर कोणतीही वस्तू आपल्याला दिसण्यासाठी अशा दुसऱ्याकडून आलेला प्रकाश त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते.
प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. त्यामुळे त्या वस्तूवरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे किरण असेच शहाण्यासारखे सरळ रेषेत प्रवास करत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची नीटस स्वच्छ प्रतिमा डोळ्यांच्या पडद्यांवर उमटते. जोवर प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तोवर हा सरळ रेषेतला प्रवास कोणताही अडथळा न येता पार पडतो. जर माध्यम बदललं तर मात्र परिस्थिती वेगळी होते. याचं कारण प्रकाशाचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त म्हणजे सेकंदाला तीन लाख किलोमीटर एवढा असतो. हवेत त्यापेक्षा थोडा कमी असतो. पाणी किंवा काच यांसारख्या घन माध्यमांमध्ये तो आणखी कमी होतो. रिकाम्या रस्त्यावरून आपण सुसाट धावू शकतो; पण त्याच रस्त्यावर माणसांची गर्दी असली तर सहाजिकच आपला वेग कमी होतो. प्रकाशाची गती ही वेगळी नसते.
त्यामुळेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना या वेगातील फरकामुळे प्रकाशकिरण वाकतात. ज्या माध्यमात वेग कमी असतो त्या माध्यमाच्या दिशेनं ते वाकतात. समजा तुम्ही विशिष्ट वेगानं डांबरी रस्त्यावरून सायकल चालवत आहात. मध्येच बाजूच्या गवताळ भागात जर सायकलचं चाक गेलं तर सायकल त्या बाजूला वळते. कारण डांबरी रस्त्यापेक्षा गवताळ भागातून जाताना चाकाच्या गतीला विरोध होतो आणि वेग कमी होतो. प्रकाशकिरणही वाकतात ते यामुळेच.
आता एखाद्या पेल्यात ठेवलेल्या पाण्यात आपण एखादी पेन्सिल ठेवतो तेव्हा ती जर संपूर्णपणे त्या पाण्यात बुडालेली असेल तर ती एकसंधच दिसते. कारण तिच्यावरून परावर्तित झालेले किरण संपूर्णपणे एकाच माध्यमातून प्रवास करत असतात. जेव्हा असे किरण पाण्याबाहेर येऊन हवेतून प्रवास करू लागतात तेव्हा सर्वच किरण एकसाथ वाकतात. त्यामुळे परत पेन्सिल एकसंधच दिसते.
जेव्हा पेन्सिलीचा काही भाग पाण्यात असतो आणि काही पाण्याबाहेर असतो तेव्हा तिच्या वरचा म्हणजे हवेत असलेल्या भागावरून परावर्तीत होणारे प्रकाशाचे किरण केवळ हवेतूनच प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात. ते एका रेषेत प्रवास करतात; पण पाण्यात असलेल्या भागावरून निघालेले किरण काही अंतर पाण्यातून प्रवास करतात आणि मग पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर पडून ते हवेतून प्रवास करू लागतात. त्या वेळी त्या दोन भागांमधल्या वेगातल्या फरकामुळे त्यांची दिशा बदलते. आपल्या डोळ्यांना ते हवेतून येणाऱ्या किरणांपेक्षा वेगळ्या दिशेने येत असल्यासारखे दिसतात. या दोन दिशांमधल्या फरकामुळे पेन्सिलीच्या दोन भागांमध्ये काही कोन असल्याचा भास आपल्याला होतो. म्हणूनच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ती वाकल्यासारखी किंवा मोडल्यासारखी दिसते. प्रकाशाच्या या आविष्काराला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या म अपवर्तनापोटीच बिचार्या पेन्सिलीवर मोडण्याची पाळी येते.
*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा