══════════════════════
@ संकलन @
गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?*
************************************
जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक.
वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते.
जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात.
ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो.
संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे.
'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा