══════════════════
*🤔 【 कुतूहल 】 🤔*
______________________________
*🖥️✒️संकलन✒️💻*
गजानन गोपेवाड
~==========================~
*कुतूहल : आणि जीवनाचे सूप तयार झाले!*
निसर्गात पहिल्या जीवाचा प्रवेश नेमका कसा झाला असेल बरे? ‘प्रारंभी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे अस्तित्व नव्हते. म्हणूनच सेंद्रिय संयुगे तयार होण्यासाठी योग्य परिस्थिती होती. याच सेंद्रिय संयुगांनी जीवसृष्टीच्या उत्पत्तीला कच्चा माल पुरवला. ‘यावर कोणी तरी प्रयोग करायला हवा.’ हॅरॉल्ड युरे आपल्या भाषणात बोलत होते. स्टॅनले मिलर या विद्यार्थ्यांने ही कल्पना तात्काळ उचलून धरली. मिलरने आपल्या प्रयोगासाठी मिथेन, अमोनिया, बाष्प आणि हायड्रोजन यांचे मिश्रण वापरले. मिश्रणाला ऊर्जा पुरवण्यासाठी त्याने ‘स्पार्क डिस्चार्ज’चा उपयोग केला. दोन विद्युत अग्रांमध्ये थोडे अंतर ठेवून त्यांना प्रचंड विद्युत दाब दिला म्हणजे अग्रांमधील जागेत प्रकाशमय ठिणगी उमटते, त्याला स्पार्क डिस्चार्ज (विद्युतन्मोच) असे म्हणतात. हवा ही वस्तुत: विद्युत दुर्वाहक असली तरी प्रचंड विद्युत दाबाखाली हवेची विद्युत दुर्वाहकता नष्ट होते. पृथ्वीवरील प्रारंभीच्या वातावरणातील विद्युल्लतेचा चमचमाट म्हणजेच हा स्पार्क डिस्चार्ज. वायूच्या मिश्रणात स्पार्क डिस्चार्जद्वारा ऊर्जा प्रविष्ट केल्यानंतर पावसाचा आभास निर्माण करण्यासाठी ते मिश्रण एका थंड नळीतून जाऊ देण्यात आले. त्यामुळे पाण्याला उष्णता देऊन सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते तशी स्थिती निर्माण झाली. उष्णता पुरवण्याचा वेग, मिश्रणातील वायूंचे प्रमाण, तापमान, स्पार्क (ठिणगी) आणि थंडपणा या घटकात थोडे थोडे बदल करून मिलरने आपला प्रयोग सात दिवस चालू ठेवला. प्रयोग समाप्त झाला त्या वेळी उपकरणाच्या तळाशी ग्लायसिन आणि अॅनेलीन ही दोन अॅमिनो आम्ले साचलेली आढळली. अॅमिनो आम्ले जीवसृष्टीच्या धारणेचे मूळ घटक आहेत. आपल्या शरीरात एकूण २० उपयुक्त अॅमिनो आम्ले निसर्गाने वापरलेली आहेत. त्या उपकरणाच्या तळाशी युरिया, फॉर्मिक आम्ल, अॅसेटिक आम्ल आणि प्रॉपिऑनिक आम्ल असे सेंद्रिय रेणूदेखील तयार झालेले आढळून आले. हे सर्व रेणू जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहेत. फॉर्मिक, अॅसेटिक आणि प्रॉपिऑनिक ही आम्ले स्निग्ध पदार्थाचे घटक आहेत. अॅमिनो आम्लशृंखलाच पुढे प्रथिने तयार करते. युरियामधील नत्र हे तर अनेक जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
या प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर विज्ञान जगतात कुतूहलाची एक लाट निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या साध्या रसायनांद्वारे जीवसृष्टी धारण करू शकेल अशी सेंद्रिय संयुगे निर्माण झाली. हीच संयुगे विविध प्रकारांनी सम्मीलित होऊन त्यामधून अत्यंत प्राथमिक स्तरावरील सूक्ष्म जीव निर्माण झाले. पुढे डार्विनच्या ‘नैसर्गिक निवड’ तत्त्वानुसार अधिक गुंतागुंतीची जीवसृष्टी विकसित होत गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा