*🇮🇳 "प्रवास अखंड भारताचा" 🇮🇳*
*भाग १ : "अखंड भारत"*
अखंड भारत हा भारतीयांसाठी हळवा विषय आहे. ज्या ज्या वेळी अखंड भारताविषयी आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, त्यावेळी भारताच्या सीमा, वैभव, समृद्धी पाहून आम्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो.
अखंड भारताच्या भौगोलिक सीमेत *अफगाणिस्तान पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, थायलँड, जावा, सुमात्रा, मलेशिया, व्हिएतनाम, इ.* देशांचा समावेश होता. या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा अजून सुद्धा आपल्याला दिसतात. उदाहरण द्यायचे झाल्यास बँकाॕक (थायलंड) येथील एका विमानतळाचे नाव *सुवर्णभूमी* असे आहे. अफगाणिस्तानातील बुद्ध मूर्तींची विटंबना तालिबान्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली आपण जाणतोच. तत्कालीन अखंड भारताचे क्षेत्रफळ जवळपास ७८ लाख वर्ग कि.मी. एवढे होते. आज खंडित होऊन जवळपास ते ३३ लाख वर्ग कि.मी. एवढा राहिले आहे. अखंड भारताच्या सीमेचा उल्लेख विष्णूपुराणात सुद्धा सापडतो.
राजकीय व्यवस्था तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने अखंड भारत १६ जनपदांमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे राजे होते. काही साम्राज्ये खूप मोठी, तर काही अगदी छोटे होती. खूप मोठे साम्राज्य असलेला राजा, हे राजांचे राजा. त्यांना सम्राट म्हटलं जायचे.
अखंड भारतातील राजांमध्ये आपापसात लढाया व्हायच्या का? तर त्याचे उत्तर "होय" असे देता येईल. स्वतःचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राजे लढायांचा मार्ग सुद्धा अवलंबित. ज्यामुळे नवीन राज्ये, साम्राज्ये निर्माण व्हायची, त्यांच्या सीमा वाढायच्या, कमी व्हायच्या, तसेच नष्ट व्हायच्या. परंतु अखंड भारताच्या सीमेला धक्का सुद्धा लागायचा नाही. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात एक व्यवस्था होती. *अखंड भारताच्या सीमेचे रक्षण* करण्याची जबाबदारी ही सीमांत प्रदेशातील राज्यांवर असायची. बाह्य क्षेत्रातून आक्रमण व्हायचे, तेव्हा तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवरती असायची. सीमांत प्रदेशातील राजांना सर्वजण सहाय्य करायचे. ह्या व्यवस्थेच्या कारणाने भारताच्या सीमा सुरक्षित राहिल्या होत्या.
अखंड भारतात *"राष्ट्र"* ही संकल्पना होती का ? तर काहीजण होती, तर काहीजण नव्हती असे म्हणतात. परंतु राष्ट्राची सर्वप्रथम संकल्पना ही *विष्णुगुप्त (चाणक्य)* यांनी मांडली असे म्हणतात. "राष्ट्रापेक्षा मोठे कोणीही नाही." *"राष्ट्र प्रथम"* ही संकल्पना आर्य चाणक्याची.
अखंड भारतात वेगवेगळे राजे होते, सम्राट होते. त्यांच्या आपापसात लढाया व्हायच्या. तरीही भारत अखंड राहिला. कारण येथील सर्वांची धर्म, संस्कृती एक होती. त्याचबरोबर येथे ज्ञाननिर्मिती सुद्धा व्हायची. *गुरुकुल पद्धती* सोबतच मोठमोठी विद्यापीठे त्याकाळी प्रसिद्ध होती. ज्यात *नालंदा, तक्षशिला* यांचा समावेश होता. ज्यांचा भर धर्म, संस्कृती, ज्ञाननिर्मिती, राष्ट्रभावना, मातृभूमी प्रेम यावर होता. गुरुकुल तसेच विद्यापीठाच्या प्रभावामुळे तसेच इथे शिकलेल्या ज्ञानामुळे *माॕ भारतीचे रक्षण करणे* आपले कर्तव्य आहे, याची जाणीव तत्कालीन अखंड भारतातील जनमानसांत होती.
*#प्रवास_अखंड_भारताचा*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🔸 "प्रवास अखंड भारताचा6" 🔸*
*भाग २: पहिले आक्रमण*
अखंड भारतावर बाह्य आक्रमणे पुष्कळ झाली, परंतु दखल घेण्याजोगे जे आक्रमण झाले ते सिकंदरचे. इ. पू. ३०० च्या आसपास संपूर्ण विश्व जिंकण्याच्या उद्देशाने *सिकंदर* निघाला होता. या अनुषंगाने सिकंदरचे भारताच्या सीमेवर आक्रमण सुरु झाले. सीमांत प्रदेशातील राजे सिकंदरशी लढत होते. सिकंदरची ताकद खूप जास्त होती. तत्कालीन व्यवस्थेनुसार या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सीमांत प्रदेशातील राजांना इतर राजे आणि सम्राट यांनी मदत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. बहुतांशी सम्राट तटस्थ राहिले. *गांधार नरेश अंभी* सिकंदरला मिळाला. या कारणाने अंभी हा पहिला गद्दार ठरतो.
तत्कालीन अखंड भारतात *मगध* हे साम्राज्य सर्वात मोठे आणि प्रबळ होते, परंतु मगध सम्राट धनानंद तटस्थ राहिला. त्या कारणाने सिकंदरने भारताचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. बऱ्याच सम्राटांची उदासीनता पाहून तत्कालीन *विद्यापीठे* पुढे सरसावली. विद्यापीठातील शिक्षक संकटाशी सामना करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते *आचार्य विष्णुगुप्त* यांचे, ज्यांना आर्य चाणक्य म्हणून देखील ओळखले जाते.
राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या चाणक्यांनी, *"राजा म्हणजे राष्ट्र नाही आणि राष्ट्र म्हणजे राजा नाही." "राष्ट्र प्रथम"* सिद्धांताची आठवण तत्कालीन राजांना करून देण्यास सुरुवात केली. राष्ट्रावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी त्यांनी मगधनरेश धनानंदाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. परंतु मगधनरेश धनानंदाने त्यांचे न ऐकता, त्यांचा अपमान करून त्यांना राज्यसभेतून हाकलून दिले. त्यानंतर *आचार्य चाणक्य* यांनी चंद्रगुप्ताच्या सहाय्याने धनानंदाचा पाडाव केला व सिकंदरने जिंकलेला भूभागसुद्धा जिंकून घेऊन एकछत्री अंमल भारतावर निर्माण केला.
त्यानंतर युनानी आणि फारसी आक्रमणे होत राहिली. त्यांनी भूभाग जिंकले, संपत्ती लुटली, परंतु आक्रांतांनी आपली संस्कृती, धर्म येथे वाढवायचा प्रयत्न केला नाही. जे इथे राहिले, त्यांनी येथील *धर्म-संस्कृतीशी जुळवून घेतले.* ते इथे एकरूप झाले. या कारणाने या काळातील आक्रमणांचा अखंड भारतावर फारसा फरक पडला नाही. तसेच येथील संस्कृती अबाधित राहिली.
चंद्रगुप्ताने साम्राज्याचा पुष्कळ विस्तार केला. तसेच संस्कृतीचीसुद्धा त्याच्या काळात भरभराट झाली. या काळात *बौद्ध धर्म* तसेच *जैन धर्म* यांचा प्रभाव वाढायला लागला. चंद्रगुप्ताने आपल्या उत्तरकाळात राज्याची जबाबदारी आपला मुलगा बिंदुसार याच्यावर सोपवून जैन धर्म स्वीकारला व तो जैन मुनी झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संकलन -)गजानन गोपेवाड उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा