*🌼जय सद्गुरु!!*🙏
🔥🔥🔥
*💫भोग भोगावे लागणं, त्याचा ताप सहन करावा लागणं हे पूर्णतः प्रारब्धावर अवलंबून आहे. परंतु नाम हे त्या भोगावरील वेदनाशामक औषधी आहे. वेदनाशामक औषध वेदना कमी करत नाही तर तिचा तुम्हाला म्हणजेच मेंदूद्वारे शरीराला जाणवणारा दाह कमी जाणवेल याची काळजी घेतं. हेच कार्य नाम करतं. भगवंत जो अनेक रुपात वास करून आहे, तोच गुरुरूपात पुनः प्रकट होऊन कलियुगी जनसामान्यांना खडतर असणारं आयुष्य सुलभ करण्यासाठी उपस्थित झाला आहे. अनेक देही विस्तारलेला हा गुरुमहिमा मुळात एकाच मूळ तत्वापासून प्रकट झाला आहे. खरा गुरू हा भक्त, साधक वा शिष्यांजवळ फक्त आणि फक्त नाम, ईश्वरसेवा, हळूहळू प्राप्त होणारं निरिच्छत्व मागतो आणि कांक्षीतो. या व्यतिरिक्त जे मागणारे असतील ते बाह्य भाव भिन्न परी अंतरी भाव वेगळे असे समजावे.*
*जर भोग भोगावे लागतातच, तर मग सद्गुरू, नाम, ईश्वर हवंच कशाला ? प्रश्न योग्य आहे. पण खोलात जाऊन विचार केला तर कळतं की, रोग झाल्यावर, सर्व रोग घरबसल्या बरे होत नाहीत. तर काहींसाठी डॉक्टरकडे जावं लागतं, आजाराप्रमाणे काही दिवस औषध घ्यावं लागतं, त्यानंतर सुधारणा होऊ शकते. तेदेखील प्रारब्धात लिहिलं असेल त्यानुसार. म्हणजे योग्य इलाज होणार असेल तेंव्हाच त्या डॉक्टरकडे जायची प्रेरणा होते. तोपर्यंत भोग भोगूनच कमी करावे लागतात. परंतु भोग भोगत असताना ईश्वर हा नामरूपात सोबत असेल तर भोग सुसह्य होतात. त्यावरील औषध हे प्रारब्धात असेल तर मिळतं कसंही. परंतु ईश्वर सोबत असल्याने ताप सहन करण्याची शक्ती, जगण्याची प्रेरणा आणि झुजण्याची जिद्द मिळत जाते. म्हणून कठीण परिस्थितीत ईश्वराची प्रार्थना वा नामरूपात तो सोबत असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.*🌹🙏
*जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु!!*
गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा