═════════════
*@ संकलन @*
*श्री. गजानन गोपेवाड
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
═════════════
📙 *बायोगॅस*
******************
अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो.
१९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.
या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.
या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे.
उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.
स्वस्त, स्वच्छ इंधन व कचर्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा