══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड *
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *नखं कापताना वेदना का होत नाहीत?*
**********************************
सुई-दोरा घेऊन आपण सदऱ्याचं किंवा ब्लाऊजचं तुटलेलं बटण शिवत असतो. साधी सरळ सरावातली प्रक्रिया. त्यामुळे काही वेळा आपण आपली नजर त्या बटणावरून हलवत दुसरीकडे कुठंतरी पाहतो. हात मात्र शिवण्याची ती प्रक्रिया इमानेइतबारे पार पाडत असतात; पण आपलं लक्ष आता दुसरीकडे वेधलं गेल्यानं सुई कापडात शिरण्याऐवजी आपल्या बोटात शिरू पाहते. ती टोचताक्षणीच आपण ऊऽई करत किंचाळतो. कारण तेवढ्याशा त्या टोचण्यानंही आपल्याला वेदना होतात. कळ येते. मग अख्खं नख कापताना किंवा डोक्यावरचे केस कापून घेताना आपल्याला वेदना का होत नाहीत? एवढंच काय, पण डोक्याचं साफ मुंडण करून चमनगोटा करून घेतानाही आपल्याला वेदना होत नाहीत. दाढी करतानाही ती गुळगुळीत व्हावी म्हणून आपण गालावरचे केस जवळजवळ मुळापासून छाटून टाकत असतो आणि तरीही वेदना होत नाहीत. असं का, हा प्रश्न त्या टोचणाऱ्या सुईसारखा टोचत राहतो ना त्याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला वेदना का होतात हे पाहिलं पाहिजे. शरीरातल्या जिवंत पेशींशी मज्जातंतू जोडलेले असतात. त्या पेशींची मोडतोड झाली, त्यांना इजा झाली की या मज्जातंतूंची टोकं चाळवली जातात. त्यांच्यामधून विद्युत्रासायनिक संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि वेदनेची जाणीव आपल्याला होते. जर हे मज्जातंतू चाळवलेच गेले नाहीत तर वेदना होणारच नाही. नखं आणि केस या मृतपेशी असतात. त्यामुळे त्यांच्याशी मज्जातंतू जोडलेले नसतात. साहजिकच नखं कापताना किंवा केस कापून घेताना वेदना जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; परंतु केसांची वाढ ज्या फॉलिकलमधून होते त्या जिवंत पेशी असतात. केस कापण्याऐवजी ते उपटले तर या पेशींना धक्का पोहोचतो. त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतूंना त्याचा प्रभाव जाणवतो व आपल्याला वेदना होतात. नखांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असते. नखं जर मृत पेशींची बनलेली असतात तर मग त्यांची वाढ कशी होते? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. प्रत्यक्षात नखांच्या मुळाशी असलेल्या पेशींची वाढ होते व नखांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. ती वरच्या मृत पेशींना वरच्या दिशेनं ढकलते. नखं वाढतात. कालांतरानं या नव्या प्रतीतल्या पेशीही मृत होतात आणि त्यांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. त्यामुळे नखांची वाढ होत असली किंवा केसांचीही, तरी त्या मृत पेशी असल्यानं त्यांची कापाकाप होताना अजिबात वेदना होत नाहीत. दाढीच्या बाबतीतही ही स्थिती असते. कितीही गुळगुळीत दाढी केली तरी ती करताना त्या केसांच्या फॉलिकलना धक्का पोहोचत नाही; पण इलेक्ट्रीक शेव्हरनं दाढी करताना काही वेळा त्यात अडकलेला दाढीचा केस ओढला जातो, उपटला जातो आणि वेदना होतात. गुळगुळीत दाढी करणारी ब्लेड जरा जोरानं ओढली जाऊन खालच्या कातडीला कापते. वाहणाऱ्या रक्ताबरोबर वेदनांचा प्रवाहही सुरू होतो.
*-डॉ.बाळ फोंडके यांच्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा