सोमवार, २२ मार्च, २०२१

यंत्र मानव लेखन गजानन गोपेवाड


यंत्रमानव   ,

📙 *__* 📙  

**************** 

 

_सामान्य माणसाच्या मनात यंत्रमानवाबद्दल (रोबो) अत्यंत अवास्तव कल्पना असतात. वाट्टेल त्या गोष्टी करू शकणारा, पण त्याला कसलीही इजा होऊ न शकणारा, माणसाच्या रूपाच्या जवळपास जाणारा असा यंत्रमानव त्याच्या कल्पनेत असतो. या कल्पनेला खतपाणी घातले आहे, ते सिनेमांनी. पण प्रत्यक्षातला यंत्रमानव हे एक ओबडधोबड यंत्रच असते. फक्त त्या यंत्राचा एखादा 'हात' उपयुक्त काम करण्यात तरबेज असतो. हे सारे मानवासारखे दिसत नाही, कल्पनेशी तर अजिबात जुळत नाही. मग पाहणार्‍याची झालेली 'फसवणूक' जेव्हा हा यंत्रमानव प्रत्यक्ष काम करू लागतो, तेव्हाच थोडीशी कमी होऊ लागते._

     _एखादा यंत्रमानव धोकादायक वातावरणात, प्रदूषित हवेत, धूळ, उष्णता, दमटपणा, ओल याला दाद न देता सतत काम करू शकतो. त्याला ना कामाचा कंटाळा, ना दमणूक. तो ना चूक करीत, ना जास्त हुशारी दाखवीत. कसलीही अडचण कामात निर्माण झाली, तर तो शांतपणे काम तिथेच बंद करतो व वरिष्ठाला संदेश पाठवून देतो. यंत्रमानव म्हणजे पक्कया आधारावर टक्का आधारलेला यांत्रिक हातच म्हणाना. या हाताला गरजेप्रमाणे हालचाली दिलेल्या असतात. म्हणजे पक्कड घेण्यासाठी एक चिमटा, खाली वा वर करणे, गोलाकार फिरवणे, मागे पुढे करणे किंवा स्क्रू पिळण्याची उलटसुलट क्रिया करणे या स्वरूपाच्या हालचाली या हाताकरवी होऊ शकतात. हाताची लांबी कमी जास्त केली जाते._

     _यापुढचा भाग म्हणजे हालचाली नियंत्रित करण्याचा. यासाठी यंत्रमानवाच्या मेंदूत म्हणजे कॉम्प्युटरमध्ये एक आज्ञावली भरलेली असते. त्यानुसार व्यवस्थित हालचाली होत राहतात. अडथळा आल्यास कधी व कसे थांबायचे, हेही आज्ञावलीत नमूद केलेलेच असते. प्रामुख्याने यंत्रमानवाकडे वेल्डिंग, सरफेस ग्राइंडिंग, पेंटिंग, भट्टीजवळची कामे सोपवली जातात. एखाद्या सरकत्या पट्ट्यावर समोर येऊन ठाकलेल्या वस्तूवर योग्य ती प्रक्रिया यांत्रिकपणे करण्याचे काम यंत्रमानव करतो. संपले की, थांबतो. पट्टा पुढे सरकून नवीन वस्तू समोर येते. पुन्हा काम सुरू. हा प्रकार अव्याहत चालू राहतो. सहसा सर्वात जास्त यंत्रमानव वाहननिर्मितीच्या कारखान्यांत वापरले जातात._

     _यंत्रमानवाची निर्मिती ही अत्यंत महागडी बाब आहे. त्याच्या कामाचे स्वरूप, त्यासाठीची आज्ञावली व त्याची पूर्ण निर्मिती या गोष्टींसाठी अत्यंत कुशल इंजिनिअरची गरज लागते. हाताचे काम, हालचाली नियंत्रित करायला विद्युत मोटारी, हायड्रोलिक सिस्टीम किंवा हवेच्या दाबावर काम करणारी न्यूमॅटिक यंत्रणा वापरावी लागते. आज्ञावली तयार करण्यासाठी अत्यंत किचकट, कित्येक तासांचे काम कम्प्युटरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला करावे लागते, तर या कॉम्प्युटरची घडण कशी असावी, हे हार्डवेअर इंजिनिअर ठरवतो. शेवटी हे सारे साचे तयार करून त्यांची उभारणी करणे हे गुंतागुंतीचे काम असतेच._

     _याउप्परही यंत्रमानव दुसऱ्या कामासाठी उपयोगी नसतोच. यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कारखान्यातच यंत्रमानव परवडतो. चंद्रावर गेलेली याने, त्यांनी केलेली यांत्रिक कामे ही यंत्रमानवाचा एक भाग होता. मानवरहीत उपग्रह वा प्रयोगशाळा अवकाशात प्रयोग करतात, तोही यंत्रमानवाचाच एक भाग होय. आणि स्टारवॉर्समध्ये दिसणाराही यंत्रमानवच होता. यंत्रमानवासारखेच तयार केलेले 'यंत्रप्राणी' 'जुरासिक पार्क' या सिनेमात डायनासाॅरचे काम करतात._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड *

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...