══════════════════════
@ संकलन @
गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📙 *डासांमुळे होणारे आजार* 📙
**********************************
मलेरिया, हत्तीरोग, चिकुनगुनिया, डेंग्यू या चार आजारांच्या प्रसारासाठी डासांच्या विविध जाती कारणीभूत ठरतात. यांतील प्रत्येक आजाराने जगाच्या पाठीवर, भारतातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.
आपण चारही आजारांची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक ठरते; कारण भारतात कुठेही गेलात, तरी डास तुमच्या भोवती गुणगुणतच असतात, चावत असतात.
सर रोनाल्ड रॉस या जन्माने भारतीय डॉक्टरचा मलेरियाच्या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशातील अल्मोरा गावी १३ मे १८५८ रोजी त्यांचा जन्म झाला. ब्रिटनमध्ये १८७९ मध्ये वैद्यकीय पदवी घेऊन भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून ते दाखल झाले. मलेरियाला कारणीभूत झालेले परजीवी सूक्ष्मजीव फ्रेंच शास्त्रज्ञ लाव्हरेन यांनी १८८० मध्ये शोधले होते. पण त्यांची वाढ, प्रसार व मलेरियासंदर्भातील डासांचे जीवनचक्र यांबद्दल रॉस यांनी सतत संशोधन चालू ठेवले. अॅनाफिलीस जातीच्या डासाच्या मादीच्या जठराच्या वळ्यांमध्ये हे परजीवी दबा धरून वाढतात व तिच्या चाव्यातून मानवी शरीरात त्यांचा प्रवेश होतो, हे निरीक्षण हैदराबादजवळच्या बेगमपेठ येथील प्रयोगशाळेत त्यांनी १८९७ साली नोंदवले. १९०२ साली त्यांना याबद्दलचे नोबेल पारितोषिक दिले गेले.
मलेरियामध्ये रात्रीच्या वेळी थंडी वाजून येते व दिवसा ताप उतरतो, पण अशक्तपणा येतो. यामुळे हीव म्हणजे थंडी आणणारा ताप म्हणून हिवताप या नावाने तो प्रसिद्ध आहे. परजीवींची वाढ लाल रक्तपेशीत होते व त्यांचे विघटन झाल्याने रक्तक्षय होतो, हा मलेरियाचा एक उपद्रव, क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.
स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.
यांपैकी चिकनगुनिया या आजाराची सुरुवात आफ्रिकेमध्ये टांझानियात १९५२ साली झाली. कोलकात्यामध्ये १९६३ साली पहिली लागण झाल्याची नोंद आहे. केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसात नंतर याने अधूनमधून तोंड वर काढले. सुमारे ४३००० लोकांना त्यावेळी चिकनगुनियाने पछाडले होते. महाराष्ट्रात प्रथम मराठवाडा, विदर्भ येथे व नंतर अनेक ठिकाणी गेल्या ३ वर्षांत चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ या डासांनी आता महाराष्ट्रातही ठाण मांडले आहे. चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो. शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. घराघरांतून धडधाकट माणसे सांधे आखडल्यामुळे काम करू शकत नाहीत, हे दृश्य या आजाराने धुमाकूळ घातलेल्या अनेक गावांमध्ये दिसून येते. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.
डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. त्यात अडथळा येऊन विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो. रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.
हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. एक ते दोन सेंटीमीटर एवढी त्यांची वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. अतिसूक्ष्मापासून पूर्ण वाढीपर्यंत दोन आठवड्यांत यांची प्रगती होते. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात; पण हत्तीसारखा जाड पाय झाल्यास हालचाल, काम करणे अवघड होते. पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते. हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध वापरले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.
डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की डास चावण्यापासून प्रतिबंधक हाच एक उपाय सध्यातरी आपल्या हातात आहे. डास मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे पचवुन त्यांच्या नव्या प्रजाती सतत तयार होत गेल्या आहेत. डीडीटी तर त्यांनी कधीच पचवले आहे. साचलेल्या पाण्यावर तेलाचा तवंग सोडून डासांच्या अळ्यांना प्राणवायू मिळू न देता त्यांचा नायनाट हा प्रकार छोटय़ा जलाशयात केला जातो. परमॅथ्रिनसारखी द्रव्ये, अन्य रसायने यांचा वापर केला जातोच. त्यामुळे डास आपल्यापासून दूर राहतात. मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डासांना सहन न होणारी तीव्र वासाची द्रव्ये हवेत फवारणे वा त्वचेवर लावणे हाही एक उपाय आहे. मच्छरदाणी, लांब हातापायांचे कपडे हाही उपाय केला जातो.
मात्र आजही गरीब असो वा श्रीमंत, झोपडीत राहणारा असो वा उंच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणाऱा या सर्वांनाच डासांनी नकोसे करून सोडलेले आहे. त्यांच्यामुळे फैलावणारे आजार आज सर्वांनाच सारखे त्रास देत आहेत. नजीकच्या भविष्यात उष्ण कटिबंधातील सर्व माणसांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, हे निश्चित.
'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा