बुधवार, ७ एप्रिल, २०२१

पेनिसल इंजेक्शन बदल

 *_आजची माहिती_*


*_📕पेनिसिलीनचे इंजेक्शन देताना आधी काय तपासणी करतात?📕_*

***************************************


_पेनिसिलीन हे एक प्रभावी प्रतिजैविक आहे. अनेक जिवाणूंच्या विरोधात हे औषध उपयोगी पडते. पेनिसिलीनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तोंडाने घ्यावयाच्या गोळ्या, स्नायूत वा शिरेद्वारे द्यायचे इंजेक्शन अशा स्वरूपात ते मिळू शकते. डॉक्टर गरजेनुसार गोळ्या वा इंजेक्शनचा वापर करतात. तुमच्यावरही कधीतरी पेनिसिलीनचे इंजेक्शन घेण्याचा प्रसंग आला असेल. पेनिसिलीनचे इंजेक्शन देताना डॉक्टर आधी हातावर, कोपखच्या थोडे खाली पेनिसिनीनचे ०.१ मिली एवढे इंजेक्शन त्वचेखाली टोचतात. टोचलेल्या भागाभोबती ते बॉलपेनने वर्तुळ काढतात. ४५ मिनिटांनी त्या भागाची तपासणी करतात. त्यानुसार पेनिसिलीनचे इंजेक्शन আायचे की नाही ते ठरवतात. पेनिसिलीनची रिऑॅक्शन येते का हे पाहण्यासाठी वरील उपाय योजतात._

     _आता रिअॅक्शन म्हणजे काय ते पाहू, शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही वाहेरील पदार्थाच्या/घटकाच्या विरोधात शरीरातील पांढऱ्या पेशी, IgE नावाचे प्रतिदव्य, विशिष्ट प्रतिक्रिया घडवून आणतात. सामान्यतः ही प्रतिक्रिया वा रिअॅक्शन मर्यादित स्वरूपाची असते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही प्रतिक्रिया अवाजवी प्रमाणात जास्त असते. परिणामस्वरूप श्वासनलिका व श्वासमार्गातील लहान लहान नलिकांच्या स्नायुचे आकुंचन होऊन श्वास घ्यायला अडचण निर्माण होते, स्वरयंत्राला सूज येते, छातीत धडधड होते, हातापायाला कंप सुटतो, हातपाय गार पडतात, चक्कर येते. क्वचित श्वसन बंद पडून वा हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. असे होऊ नये म्हणून औषधाचा अत्यंत कमी प्रमाणात डोस देऊन रिअॅक्शन येते का ते आधी पाहतात. रिअंक्शन येणार असेल तर व्यक्तीला अर्ध्या तासात चक्कर यायला लागते, हातपाय गार पडतात. इंजेक्शन दिलेल्या जागी लालसरपणा येतो व सूज येते. असे जर घडले तर डॉक्टर पेनिसिलीनचे इंजेक्शन देत नाहीत. अशीच तपासणी शिरेवाटे द्यावयाच्या इतर औषधांसाठीही करता येते._

     _पेनिसिलीन वा इतर कोणत्या औषधाची रिअॅक्शन असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांकडे गेल्यावर उपचार घेण्यापूर्वीच डॉक्टरांना त्याविषयी सांगावे. त्यामुळे डॉक्टर दुसरे औषध सुचवतील व रिऑक्शनमुळे होणारा शारीरिक त्रास किंवा क्वचित होणारा मृत्यू टाळता येईल._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

डोक्यावरचे केस पांढरे, काळे

 *_आजची माहिती_*


*_📕काहींचे केस काळे, तर काहींचे सोनेरी का असतात?📕_*

***************************************


_आपल्या देशामध्ये सामान्यत: काळे केस आढळतात. असे दिसते की उष्ण कटिबंधातील देशांमध्ये काळे केस असतात शीत प्रदेशातील लोकांचे केस सोनेरी असतात केसांचा रंग आनुवंशिकतेवरही अवलंबून असतो. रंग ठरवण्याची ही महत्त्वाची कारणे असली तरी त्याला कारणीभूत केसात असणारे रंगद्रव्य असते केसांचा उभा छेद घेतला असता त्याचे बाह्यस्तर मध्यस्तर बाह्यकवच असे भाग दिसतात. या बाह्यकवचामध्ये असलेल्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे केसांना रंग असतो. या रंगद्रव्याच्या प्रमाणावर केसांना काळा, तपकिरी, सोनेरी असे रंग येतात. मेलॅनिन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असेल, तर केस काळे असतात. उष्ण कटिबंधातील व्यक्तींच्या त्वचेत, केसात हे रंगद्रव्य अधिक असल्याने केस काळे व त्वचेचा रंग काळा, गव्हाळ असा असतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कुट्टुक

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *कुट्टक*

**********


_सामान्यत: समीकरणांच्या संख्येपेक्षा जास्त चल असलेली समीकरणे अनिर्धार्य (इनडिटरमिनेट) असतात. ती सोडविण्याच्या पद्धतीला प्राचीन भारतीय गणितज्ञ ‘कुट्टक’ म्हणजे चूर्ण करण्याची क्रिया (पल्वरायझर) म्हणत. खगोलशास्त्रातील अक्ष + क = बय या समीकरणातील मोठमोठे आकडे असलेले अ, ब, क हे सहगुणक लहान करण्यासाठी ही प्रक्रिया शोधली गेली. कुट्टकात ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ हे ज्ञात, तर ‘क्ष’ आणि ‘य’ हे अज्ञात पूर्णांक असतात. उत्तर पूर्णांकी येण्यासाठी ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या म. सा. वि.ने ‘क’ला नि:शेष भाग जायला हवा. या पद्धतीने सोडवलेले एक उदाहरण पाहू._


_‘केळ्यांच्या समान संख्येच्या ६३ ढिगांमध्ये ७ केळी मिळवली आणि २३ प्रवाशांमध्ये समान वाटली तेव्हा एकही केळे उरले नाही. तर प्रत्येक ढिगात किती केळी होती?’ (गणितसारसंग्रह, महावीराचार्य)_

     _येथे ६३क्ष + ७ = २३य हे समीकरण सोडविण्यासाठी म. सा. वि. काढण्याच्या भागाकार पद्धतीप्रमाणे १ बाकी येईपर्यंत भागाकार करावयाचे. यात २, १, २, १ ही भागाकारांची वल्ली (वेल). वल्लीच्या खाली क = ७ ही संख्या व त्याखाली शून्य लिहावे. नंतर शेवटून क्रमाने दोन संख्यांच्या गुणाकारात खालची संख्या मिळवून वरवर गेल्यास ७, २१, २८, ७७ ही उत्तरे येतात. (आकृतीतील शेवटचा स्तंभ) यापैकी ७७ ला ६३ ने भागून येणारी बाकी १४ ही य ची आणि २८ ला २३ ने भागून येणारी बाकी ५ ही क्ष ची किंमत. म्हणून प्रत्येक ढिगात कमीत कमी ५ केळी हे उत्तर. अन्य उत्तरे ५ मध्ये २३ मिळवून येणाऱ्या क्रमिकेतील २८, ५१, ७४… असतील._

     _या कोड्यात वल्लीतील संख्या चार म्हणजे सम आहेत. पण त्या विषम असतील असे कोडे भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’त आहे. ‘ज्या पूर्णांकास ६० ने गुणून त्यात १६ मिळवले आणि १३ ने भागले तर बाकी शून्य राहील असा पूर्णांक सांगा.’ येथे ६०क्ष + १६ = १३य. या कोड्यात वल्ली ५ संख्यांची येते. अशा वेळी वरील पद्धतीने आलेल्या ८ व २ या किमती भाज्य (६०) आणि भाजक (१३) यातून वजा कराव्या. म्हणजे क्ष = ११ व य = ५२ अशी उत्तरे मिळतात. अन्य उकली क्ष च्या किमतीत १३ मिळवून येणाऱ्या २४, ३७, ५०… असतील. क ची किंमत ऋण असलेल्या ६०क्ष -१६ = १३य या समीकरणाचे उत्तरही थोड्या बदलांनी काढता येते. कोड्याची काठिण्यपातळी वाढवली की बौद्धिक व्यायाम घडतो. या रीतींचे गणिती तर्क समजून घेणे हेही वेगळे आव्हान आहे!_


🖊 *_निशा पाटील_*

office@mavipamumbai.org

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- ०७ एप्रिल २०२१_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य संघटना स्थापन दिवस

 *👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️७ एप्रिल १९४८👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️*

🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺

*जागतिक आरोग्य संघटना स्थापना*

🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥

जागतिक आरोग्य संघटना :

*(वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO)* 

      ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस येथील ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालया’चा (Office Internationale d’hygiene Publique) वारसा पुढे चालवीत आहे. *‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’* हे या संस्थेचे ध्येय आहे. असे प्रयत्न करणाऱ्या संस्था पूर्वीही होत्या.


   इतिहास : भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे *(इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे)* महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते. *चौदाव्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती.*


विलग्नवासामुळे रोगांचा प्रसार नेहमी थांबेच असे नाही, कारण त्या काळी रोगप्रसाराच्या कारणांचे ज्ञानच अपुरे होते. निरनिराळ्या देशांतील बंदरांत विलग्नवास व्यवस्था निरनिराळी असे, तसेच त्याकरिता केलेले कायदेही एकाच प्रकारचे नसत त्यामुळे व्यापारउदीमाला बराच अडथळा येई. १८५२ पासून या कायद्यांच्या एकसूत्रीकरणाचे प्रयत्न झाले, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सूक्ष्मजंतुशास्त्राची भक्कम पायावर स्थापना होऊन रोगप्रतिबंधाच्या मूलतत्त्वांबद्दल बरेचसे एकमत होईपर्यंत या कामी विशेष प्रगती झाली नाही. विलग्नवासविषयक नियमांमुळे साधारण एकसूत्रीपणा आल्यानंतर या कार्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा असावी, असा विचार प्रबळ झाला. अशा यंत्रणेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असावीत हा विचारही पटू लागला.


*(१) स्‍वास्थ्यसंरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय संकेतांचा अर्थ लावून त्यांत वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे त्या संकेतांचा भंग होत असल्याच्या तक्रारीबद्दल अधिकृत मत प्रदर्शित करणे.*

 

*(२) रोगविज्ञानात होत असलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी परिषदा भरवून त्यानुसार आंतरराष्ट्रीय संकेत व कायदे यांत बदल सुचविणे.*        


*(३) साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.*


   अशा माहितीच्या आधारावरच विलग्नवासविषयक नियम करण्यात येतात. १९०२ मध्ये या उद्दिष्टपूर्तीसाठी अखिल अमेरिकन आरोग्य संस्था स्थापण्यात आली. १९०९ मध्ये *पॅरिस* येथे *‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय’* स्थापण्यात आले. ही संस्थाच पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून ती १९४७ ते १९५० च्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.


   यापूर्वी कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार्याने सोडवण्यासारख्या अनेक प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले होते. उदा., औषधिद्रव्ये व रक्तरसापासून (रक्तातील घन पदार्थविरहित रक्तद्रवापासून) बनविलेल्या लसींचे प्रमाणीकरण, रोगांचे सर्वमान्य असे नामाभिधान ठरविणे, जन्ममृत्यूंची माहिती एकत्र करून पुरविणे व मादक पदार्थांविषयी (अफू, कोकेन वगैरेंविषयी) वैद्यकीय माहिती पुरविणे वगैरे. रोगासारख्या संकटाविरुद्ध आंतरराष्ट्रीय आघाडी उभारावयाची असेल, तर त्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील जनतेची आरोग्यपातळी वाढविणे हाच एक कायमचा आणि खरा टिकाऊ उपाय आहे, याचीही जाणीव होऊ लागली. रोगसंसर्ग कमी होण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांनी आपापसांत बांध उभे करणे हे प्रभावी साधन होऊ शकत नाही, हेही पटू लागले होते. पॅरिस येथील संस्थेच्या घटनेत अशा तऱ्हेच्या जागतिक प्रयत्नांना वाव नसल्यामुळे १९२१ मध्ये राष्ट्रसंघाने अशी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी केली, ही एक सुदैवाचीच गोष्ट मानली पाहिजे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

16। मार्च झिमँन ओहम

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_गेऑर्ग झिमॉन ओहम_*


*_बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ_*


*_जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९_*

****************************

_गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे._


*_ओमचा नियम_*

_संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

16 मार्च बाबाराव दामोदर सावरकर स्मृती दिवस

 ********************************


*१६ मार्च - बाबाराव दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन*


********************************


जन्म - १३ जून १८७९ (नाशिक)

स्मृती - १६ मार्च १९४५


गणेश उर्फ (बाबाराव) दामोदर सावरकर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला.


बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा.सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्तीो यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. 


तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीत देखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी 'मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. 


राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजऱ्या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, 'काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्तीगने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्त झाली. 


अभिनव भारत आणि मित्र मेळा या संघटनांचा कार्यभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळला. योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. 


फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता. 


बाबाराव सावरकर यांचे १६ मार्च १९४५ रोजी निधन झाले.

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : इंटरनेट


********************************

करामती काकुरो कोडे

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


          🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_करामती काकुरो कोडे_*

***********************


_नियतकालिकांच्या सुरुवातीपासून सर्वसामान्य वाचकाच्या बुद्धीला चालना देणारा, शब्दसंग्रह वाढवणारा, जिव्हाळ्याचा स्तंभ म्हणजे- शब्दकोडे! गणिती ज्ञानाला आव्हान देणारी कोडीसुद्धा लोकप्रिय झाली. परंतु जनमानसाला आनंद देणारी, आकड्यांना खेळवणारी, सर्व गणितप्रेमींना हवीहवीशी वाटणारी दोन प्रमुख कोडी म्हणजे- सुडोकु आणि काकुरो! दोन्हींत १ ते ९ आकड्यांच्या रचना असल्या; तरी प्रमुख वेगळेपण म्हणजे सुडोकुमध्ये आकड्यांची मांडणी महत्त्वाची, तर🙅काकुरोत आकड्यांची बेरीज महत्त्वाची असते. काकुरो हा ‘कासान’(म्हणजे बेरीज)आणि ‘कुरोसु’ (म्हणजे आडवे-उभे) या २ जपानी शब्दांचा मिळून झालेला शब्द आहे. म्हणून काकुरो म्हणजे आडव्या-उभ्या बेरजेचे अंकांचे कोडे. हे कोडे ‘डेल’ या नियतकालिकातील एक कॅनेडियन कर्मचारी जेकब ई. फंक यांनी १९६६ च्या सुमारास तयार केले. त्या वेळी कोड्याला ‘उभे-आडवे गणित (क्रॉस सम)’ हे नाव दिले गेले होते. हे कोडे ‘उभ्या-आडव्या बेरजा (क्रॉस अ‍ॅडिशन)’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. परंतु लोकप्रिय झाले ते काकुरो या नावाने!_

     _काकुरो कोडे बनते ८७८ चौरसांनी प्रत्येक चौरसाचे कर्णामुळे झालेले दोन भाग धरले, तर १६७१६ भागांनी, ज्यात काळे-पांढरे भाग असतात. नेहमीच्या काकुरो कोड्यात बेरजेचे आकडे लिहिलेले असतात. कोडे सोडवणे म्हणजे योग्य बेरजा येतील अशा अंकांनी सर्व रिकामे चौकोन भरणे. प्रथम सोप्या बेरजांचे चौकोन भरावे. उदाहरणार्थ, ४ म्हणजे १+३ किंवा ३+१, १७ म्हणजे ९+८ किंवा ८+९ इत्यादी. हे कोडे सोडवताना गणितातील क्रमपर्याय (पम्र्युटेशन) व संयोग (कॉम्बिनेशन) यांचा उपयोग करून एकच बेरीज येईल असे वेगवेगळे संच करता येतात. चौकोनात भरायची जागा साहचर्य नियम (असोसिएटिव्ह लॉ) आणि क्रमनिरपेक्षता नियम (कम्युटेटिव्ह लॉ) या गुणधर्मांनी ठरवता येते. उदाहरणार्थ, आकृतीतील कोड्यात ३० ही बेरीज असलेल्या उभ्या स्तंभात ९, ८, ७, ६ हे आकडे येऊ शकतात. त्यांपैकी ६ हाच अंक ७ च्या आडव्या ओळीत येऊ शकतो, कारण ७=६+१. तर १७\२४ हे घर उभी बेरीज १७ व आडवी बेरीज २४ सांगते._

     _काकुरोच्या दुसऱ्या प्रकारात संख्यांचा गुणाकार येतो. यात एकाच अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते. काकुरोचे उत्तर प्रवर्तन संशोधनातील (ऑपरेशनल रिसर्च) संमिश्र पूर्णांक रेषीय प्रोग्रामिंग (मिक्स्ड इंटीजर लिनिअर प्रोग्रामिंग), बिटवाइज तर्क ही संगणकीय प्रणाली आणि नेटवर्क अ‍ॅनालिसिस या विविध गणिती पद्धतींचा वापर करून काढता येते. सुडोकु व काकुरो यांचे एकत्रित कोडेही करता येते. आता काकुरोचा उपयोग वेळापत्रक निर्मिती, संदेशवहन आणि गोपनीयता अशा क्षेत्रांत करतात

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १९ मार्च २०२१_*

बस का लागते

 *_आजची माहिती_*


🚌 *_बस का लागते ?_* 🚌

**********************


_बसमध्ये प्रवास करण्यातला आनंद तुम्ही घेत असाल. काही जणांच्या नशिबात मात्र हे सुख नसते. गाडीत बसण्यापूर्वी 'एवोमीन' सारखी गोळी घेणे, प्रवासापूर्वी व प्रवासात काही न खाणे, जेवण केल्यावर प्रवास टाळणे, गाडीत सर्वात मागच्या सीटवर वा दारापाशी बसणे असे अनेक सोपस्कार त्यांना करावे लागतात. वारंवार तोंडाला रुमाल लावून बसणे आणि काही वेळा सारख्या उलटय़ा करणे, हे तुम्ही केव्हा ना केव्हा बघितलेच असेल. त्यामुळे बसमध्ये बसताना आपल्या शेजारी अशी 'संशयास्पद' व्यक्ती नाही, याची खात्री करूनच एखाद्या सीटवर आपण बसतो._

     _अंतर्कर्णामध्ये लॅबीरींथ नावाचा एक भाग असतो. चालताना, हालचाल करताना, दिशा बदलताना शरीराचा तोल सांभाळणे हे याचे कार्य असते. बसमध्ये सारख्या हादर्‍यांनी शरीर थरथरत असते, हलत असते. त्यामुळे या भागाला वारंवार संवेदना पोहोचतात व जास्तीचे काम करावे लागते. सामान्यपणे बऱ्याचशा लोकांचे लॅबीरींथ अशा बदलांशी जुळवून घेते; पण काही व्यक्तींमध्ये मात्र हादऱ्यामुळे व सततच्या वेड्यावाकड्या हालचालींमुळे लॅबीरींथच्या कार्य करण्यावर परिणाम होतो. त्यामुळे अप्रिय संवेदना मेंदूपर्यंत जातात. मेंदूतील उलटीचे नियंत्रण करणाऱ्या केंद्रावर या संवेदनांचा परिणाम होऊन व्यक्तीला उलटी होते. नंतर मानसिक ताण व आपल्याला उलटी होईल या भावनेनेही उलटी करण्याची प्रवृत्ती वाढते व जास्त उलट्या होतात. बोटीत देखील याच कारणामुळे काही जणांना उलट्या होतात. एवोमीनसारख्या औषधात उलटी थांबवणारा व झोप येणारा असा घटक असल्याने उलट्या थांबतात. अशा व्यक्तींनी गोळ्या जवळ बाळगाव्यात. प्रवासात खाद्यपदार्थ घेणे टाळावे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अर्धा तास आधी एवोमीनची गोळी घ्यावी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन_

लोकर कापड

 *_आजची माहिती_*


📙 *_लोकर_* 📙

*************


_थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच._

     _लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते._

     _कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते. लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे._

     _लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

19 मार्च मेक्सिकन रसायन शास्त्रज्ञ

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_📒मारियो जे. मोलिना 📒_*


*_मेक्सिकन रसायन शास्त्रज्ञ_*


*_जन्म: १९ मार्च १९४३_*

*******************


_मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez; जन्म: १९ मार्च १९४३) हा एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहे. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्याला पॉल जे. क्रुट्झन व फ्रँक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला मेक्सिकन व्यक्ती आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

डिप्रेशन आणि औषधे

 🧠  *_मनोवेध_*  🧠

       

🎯 *_‘डिप्रेशन’ आणि औषधे_*

*************************

_मनासारखे झाले नाही की उदास वाटणे, दु:ख होणे नैसर्गिक आहे. पण दु:ख होणे आणि ‘डिप्रेशन’ हा आजार यांमध्ये फरक आहे. शरीरातील रसायनांत बदल झाल्याने रक्तदाब वाढतो, तसेच मेंदूतील रसायने बदलल्याने ‘डिप्रेशन’ होते. याची तीव्र अवस्था असेल तर त्या वेळी कोणतेच मानसोपचार फारसे उपयुक्त ठरत नाहीत. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांकडून औषधे घेणे गरजेचे असते. ‘मेजर डिप्रेशन’मध्ये उदासीसोबत थकवा आणि निष्क्रियता असते. कोणतीही हालचाल करू नये असे वाटते, पण झोपूनही चैन पडत नाही. सारखे रडू येते, एकटेपणा आणि निराशेचे विचार मनात काहूर माजवत असतात. काहीजणांना भीतीदायक दृश्ये दिसतात. प्रकाश चांगला असला तरी समोरील वस्तू मंद प्रकाश असल्यासारख्या गढूळ दिसतात. मनात येणाऱ्या विचारांचा आवर्त तीव्र असल्याने त्यांच्यापासून अलग होता येत नाही. या साऱ्या त्रासापासून पळून जावे असे वाटते आणि त्यामुळेच आत्महत्या घडतात._

     _अशा वेळी त्या माणसाला कोणताही उपदेश नको वाटतो. शारीरिक हालचाली केल्यानंतर बरे वाटते, हे माहीत असूनदेखील प्रचंड थकवा वाटत असल्याने तेही शक्य होत नाही. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आजार वाढत जातो. ‘थायरॉइड हार्मोन्स’ कमी-जास्त झाल्याने जसा त्रास होतो, तसाच मेंदूतील ‘सेरोटोनिन’ रसायन कमी झाल्याने ‘मेजर डिप्रेशन’ हा आजार होतो. कोणत्याही शारीरिक आजाराची माणसाला लाज वाटत नाही, ते लपवून ठेवले जात नाहीत. खरे म्हणजे, ‘डिप्रेशन’ हा तसाच आजार आहे. पित्त वाढले की उलटय़ा होतात, तसे ‘सेरोटोनिन’ कमी झाले की सारखे रडू येते. पण असे रडू येणे दुर्बलता समजली जाते. ‘उलटय़ा करू नको’ असा उपदेश केला जात नाही, पण ‘सारखे रडत राहू नकोस’ असा उपदेश केला जातो._

     _समाजात याविषयी जागृती करणे खूप आवश्यक आहे. या आजारावरील नवीन औषधे खूप परिणामकारक आहेत. ती सुरू केली की महिनाभरात फरक दिसू लागतो. जग पुन्हा सुंदर आणि स्वच्छ दिसू लागते. त्यामुळे या आजारात औषधांची भीती न बाळगता ती घ्यायला हवीत. औषधांनी आत्मभान वाढले की त्यानंतर मानसोपचार उपयोगी ठरतात. या आजारात लाजण्यासारखे काहीही नाही. तो नाकारल्याने वा लपवून ठेवल्याने बरा होत नाही, तर योग्य उपचारांनी बरा होतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक-०३ जुलै-२०२०_*

गणिती वर्गीकरण

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_गणिताचे वर्गीकरण_*

*********************

_गणिताचे सहसा शुद्ध आणि उपयोजित गणित असे दोन भाग केले जातात. अमूर्त आणि लगेच वापरले जाईलच असे नसणारे शुद्ध गणित, ही मानवी बुद्धीची एक उत्कृष्ट उपलब्धी आहे. व्याख्या-प्रमेय-सिद्धता अशी त्याची सर्वसाधारण मांडणी असते. उपयोजित गणित हा गणिती पद्धतींचा वापर प्रत्यक्षात करणारा भाग आहे. अभियांत्रिकी गणित हे त्याचे एक रूप आहे. पिरॅमिडस् बांधणी ते चंद्रावर मानवी पाऊल पडणे हे त्याचे सामथ्र्य दाखवतात. त्याशिवाय मनोरंजनात्मक (रिक्रिएशनल) गणित असाही एक वेगळा वर्ग केला जातो, मात्र काही गणितींच्या मते तो फारसा महत्त्वाचा नाही. तथापि, हा गणिती भागही अनेक प्रकारे अध्यापनास आणि संशोधनास हातभार लावत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्याला दुय्यम समजून उपेक्षू नये असा मतप्रवाह जोर धरत आहे._

     _गणिताचे वेगळे वर्गीकरणही केले जाऊ शकते. एक म्हणजे, औपचारिक गणित- जे अभ्यास व सराव यांनी आत्मसात केले जाणारे शालेय ते पदव्युत्तर गणित शिक्षण. तर दुसरे, स्वाभाविक गणित- जे मनुष्याच्या आणि निसर्गाच्या सजीव सृष्टीमध्ये उपजत असते. उदाहरणार्थ, रहदारीचा रस्ता ओलांडणे हा तसे पाहिल्यास अत्यंत जटिल गणिती प्रश्न आहे, जो आपण सहज सोडवतो; पण यंत्रमानवाला तसे करणे सोपे नसते. तसेच कोणतेही गणिती शिक्षण न घेता मधमाशा त्यांच्या पोळ्यात इष्टतम मात्रेत मधाचा साठा करण्यासाठी षट्कोनी कोठारे रचतात किंवा झाडावरील फुले आदर्श सममिती राखणारे रूप घेतात._

     _आपण औपचारिक आणि स्वाभाविक गणित या दोहोंचा वापर दैनंदिन आयुष्यात करतो. औपचारिक शिक्षणामुळे आपला गणिती अनुभव समृद्ध होतो. त्यामुळे एखादे पुस्तक खणात मावेल की नाही याचा अंदाज आपल्याला एका दृष्टिक्षेपात येतो. दर वेळी पुस्तकाचे आणि खणाचे क्षेत्रफळ/घनफळ काढावे लागत नाही. म्हणून ही गणिती दृष्टी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. काही वेळा सादृश्यदर्शी (अ‍ॅनेलॉग) गणित, तर अन्य वेळा विश्लेषणात्मक गणित गरजेचे असते. जसे की, पेल्यात किती पाणी आहे हे समजण्यासाठी ते पाणी प्रमाणित मापन-भांडय़ात ओतून किंवा पेल्याचे घनफळ काढून उत्तर मिळू शकते (सादृश्यदर्शी पद्धत). मात्र पुढील सूर्यग्रहण केव्हा होईल हे जाणून घेण्यासाठी गणिती विश्लेषणच करणे भाग असते._

     _संगणकामार्फत अनुरूपण (सिम्युलेशन) हा गणिताचा आणखी एक प्रकार अलीकडेच विकसित झाला आहे. हे आभासी गणित गणिताच्या सर्व वर्गाना साहाय्यक ठरू शकते; काही वेळा ते त्यांच्या मर्यादाही ओलांडू शकते. तरी त्याचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने योग्य अशा संगणक आज्ञावली तयार करणे हे महत्त्वाचे ठरत आहे._



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- २२ मार्च २०२१_*

22 मार्च जागतिक जल दिन

 *_आज_*


*_२२ मार्च_*


💧 *_जागतिक जल दिन_* 💧

************************


_दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो._


_संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे._


*_पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?_*

_●पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?_

_●पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?_

_●भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?_

_●नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?_

_●तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?_

_●पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?_

_●पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?_

_●पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?_

_●पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?_

_●पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?_


*_आपली भूमिका काय ?_*

_●स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे._

_●पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे._

     _लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

नवनिर्मिती ची प्रेरणा

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_नवनिर्मितीची प्रेरणा_*

**********************


_गणितामध्ये कळीची नवनिर्मिती अनेकदा अंत:स्फूर्तीतून होते असे मानले जाते. मात्र अशी प्रेरणा आपल्या ताब्यात किंवा हुकमी नसल्यामुळे ती कशी आणि केव्हा जागृत होईल हे सांगणे अशक्यप्राय आहे. उदाहरणार्थ, थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन सांगत की, त्यांच्या स्वप्नात त्यांच्या कुलदेवतेच्या जिभेवरून खाली पडणारी गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर ते ती लिहून त्यांची सिद्धता देण्याचा प्रयत्न करत. अर्थात, रामानुजन अलौकिक गणितज्ञ होते, निसर्गाचा जणू चमत्कार होते. कारण ती बहुतांश सूत्रे बरोबर आहेत हे सिद्ध झाले असले, तरी ती मुळात इतकी सखोल व अफलातून म्हणता येतील अशी असून अगदी प्रज्ञावंत गणितीलादेखील सुचणार नाहीत हे जगजाहीर आहे._

     _म्हणजेच केवळ तार्किक संरचना- जसे की, पूर्णांकांसाठी उपलब्ध प्रमेय किंवा उपपत्ती वास्तव संख्यांसाठी सिद्ध करणे असे व्यापैकीकरण (जनरलायझेशन), हे पथदर्शी नावीन्यपूर्ण गणित निर्माण करीलच असे नाही. अनेकदा संदिग्धताही महत्त्वाची भूमिका बजावते; म्हणजे निष्कर्ष सदोष किंवा सकृद्दर्शनी विसंगत असू शकतात. तरीदेखील अटकळी, विरोधाभास आणि काही वेळा तर्कहीन वाटणारी स्थिती यांचा मागोवा गणितात उल्लेखनीय भर घालू शकतो. गणितज्ञ असे आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पूर्णपणे वा आंशिकपणे ते प्रश्न सोडवले जातात, तर बरेचदा त्याला दिलेल्या चौकटीत उत्तर नाही असा निष्कर्ष मिळू शकतो. उत्तर अस्तित्वात नाही अशा निष्कर्षांना गणितात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला कारण म्हणजे कुठला रस्ता घेऊ नका याचे मार्गदर्शन मिळते. तसेच चपखल नसले तरी, आसन्न (जवळचे) उत्तर मिळवण्यासाठी नवे तंत्र विकसित करण्यास चालना मिळते. वाहत्या मार्गात आलेल्या खडकामुळे जलप्रवाह काही वेळ थांबतो, पण नंतर त्याला वळसा घालून पुढे जातो. गणिताचेही काहीसे तसेच आहे._

     _गणित ही मानवनिर्मिती आहे, मात्र तिच्या मर्यादा ओलांडून विजयी होण्याचा प्रयत्न करणेही आपल्या हाती आहे. मुख्य म्हणजे, असा प्रयास कोणीही करू शकतो. त्यासाठी साधा कागद आणि पेन्सिल ही साधने पुरेशी आहेत. जोडीला गणकयंत्र आणि संगणक असेल तर उत्तम. निष्कर्षांचे व्यापैकीकरण या सरळसोट मार्गाशिवाय अन्य वाटांनी गणिताला पुढे नेण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. यासंदर्भात अद्याप सिद्धता न मिळालेल्या गणिती अटकळींनी सुरुवात करता येईल किंवा अशी कोडी- जी धन संख्यांसाठी गुंफली आहेत ती ऋण संख्यांसाठीही खरी आहेत का, हे तपासणसुद्धा चालेल! तर करायची ना सुरुवात?_



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- २२ फेब्रुवारी २०२१_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन

जागतिक आरोग्य दिन 


 

मूर्च्छा का येतो?

 *_आजची माहिती_*


📕 *_मूर्च्छा का येते ?_* 📕

*********************

_रामायणाच्या गोष्टींमध्ये लक्ष्मणाला मूर्छा आली ती गोष्ट तुम्हाला आठवत असेल. मग हनुमानाने औषधी बनस्पतीसाठी डोंगर उचलून आणला वगैरे..._

     _व्यक्ती वेशुद्ध किंवा मूर्च्छित होण्याची खूप कारणे आहेत. दारूचे जास्त सेवन केल्यास मूर्च्छा येते. डोक्यावर जोराचा मार लागला तरी व्यक्ती बेशुद्ध पडते. अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यामुळेही काही जण बेशुद्ध पडतात. विषवाधा, मधुमेह, उष्माघात, मेंदूतील रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका आणि मिरगी यांसारख्या कारणांमुळेही व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. अशक्तपणा किंवा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळेही चक्कर येते आणि व्यक्तीला मूर्छा येऊ शकते. जखमांमुळे खूप रक्तस्त्राव झाला तरी व्यक्ती बेशुद्ध होते._

     _तुमच्या एक लक्षात आले असेल की, वेशुद्ध पडण्याची अनेक कारणे म्हणजे गंभीर रोग होत. त्यामुळे घरच्या घरी प्रयत्न करून वेळ घालवण्यापेक्षा रुग्णाला तात्काळ दवाखान्यात न्यावे हेच योग्य होय. काही पथ्ये मात्र पाळावीत रुग्णाला वेशुद्धावस्थेत काहीही खायला किंवा प्यायला देऊ नये. अन्यथा पाणी वा अन्न फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होऊ शकतो. रुग्णाची मान ताणून एका बाजूला वळवावी. त्याचा जबडा आणि जीभ पुढे ओढावेत. त्याच्या तोंडात काही असेल तर ते बाहेर काढावे. श्वसन चालू नसेल, तर आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात हवा सोडावी. असे कृत्रिम श्वसन देण्यासाठी त्याच्या तोंडात हवा सोडताना त्याचे नाक दाबावे. त्याच्या तोंडात हवा सोडल्यानंतर आपले तोंड बाजूला घ्यावे. मिनिटातून १६ ते २० वेळा अशा प्रकारे त्याच्या तोंडात हवा सोडावी. लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करावे, म्हणजे योग्य उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचतील._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

पू कशाचा बनलेला असतो

 *_आजची माहिती_*


*_📕'पू' कशाचा बनलेला असतो?📕_*

*******************************

_'पू' कशाचा बनलेला असतो?_


_'पू' हा शब्द उच्चारताच तुम्हाला किळस आली असेल! तुम्ही नाकही मुरडले असेल! 'पू' म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थांचा अर्क वा कचराच जणू. यात शरीरातील पांढर्या व लाल रक्तपेशी तसेच इतर पेशी मृतावस्थेत असतात. याखेरीज जंतू व पांढऱ्या रक्तपेशी यांच्या लढाईनंतर मेलेले जंतू, पेशी व इतर द्रव्ये असतात. 'पू' पेशीही असतात. छोट्या फोडांमध्ये पू होतो. जंतूसंसर्गाचा हा परिणाम असतो. शस्त्रक्रियेच्या टाक्यांमध्ये, जखमांमध्ये जंतुसंसर्ग होऊन पू जमा होतो. पू जमा झाल्यास ताप येतो. थकवा येतो. बरे वाटत नाही. त्यामुळे कोठेही पू तयार झाल्यास तो शरीराबाहेर काढणे महत्त्वाचे असते. तसे न झाल्यास शरीराच्या आतील भागात असणाऱ्या ठिकाणचा पू वाहेर पडून रक्तात मिसळतो व जंतुसंसर्ग रक्तामार्फत शरीरभर पसरतो. मेंदूवर परिणामही होतो. प्रसंगी मृत्यू ओढवतो. त्यामुळे पू दिसल्याबरोबर तात्काळ खातमा करणे महत्त्वाचे पू मधील जंतूंचा प्रकार पाहून त्यानुसार जंतुघ्नचा वापर करावा लागतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

लेजर किरण

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

            🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_लेझर किरण_*

****************


_जेव्हा एखादा अणू एखाद्या विशिष्ट लहरलांबीचा प्रकाश शोषतो, तेव्हा तो उत्तेजित होतो. अणूने शोषलेला विशिष्ट लहरलांबीचा हा प्रकाश अणूने उत्सर्जित केल्यास अणू पुन्हा मूळ स्थितीत परततो. सर्वसाधारण स्थितीत पदार्थातील उत्तेजित अणूंची संख्या ही उत्तेजित नसलेल्या अणूंपेक्षा खूपच कमी असते. मात्र उत्तेजित अणूंची संख्या जर एखाद्या मार्गाने वाढवली, तर त्या शोषलेल्या विशिष्ट लहरलांबीचे प्रकाशकिरणही मोठय़ा प्रमाणात उत्सर्जित होऊन तीव्र प्रकाशाची निर्मिती होते. आइन्स्टाइनने या क्रियेचे भाकीत १९१७ सालीच वर्तवले होते. आणि यातूनच आपल्याला सुपरिचित असलेल्या लेझर किरणांचा १९६० साली जन्म झाला! ‘लेझर’ या शब्दाचे पूर्णरूप म्हणजे ‘लाइट अ‍ॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन’!_

     _पहिल्या लेझर किरणांची निर्मिती ही अमेरिकेतील ‘ह्य़ुझेस रिसर्च लॅब’मधील थिओडोर मायमान याने केली. यासाठी त्याने एक सेंटिमीटर व्यासाचे आणि दोन सेंटिमीटर लांबीचे गुलाबी रंगाचे माणिक (रुबी) घेतले. या माणकाच्या स्फटिकाच्या समोरासमोरच्या दोन्ही सपाट बाजूंवर प्रकाश परावर्तित होण्यासाठी त्याने चांदीचा थर दिला. यातील एका बाजूच्या चांदीच्या थराच्या मध्यावर, प्रकाश बाहेर पडण्यासाठी एक छोटेसे छिद्र ठेवले. मायमानने हा स्फटिक वेटोळ्यांच्या स्वरूपातल्या फ्लॅश लॅम्पच्या मध्यभागी ठेवला. त्यानंतर हे साहित्य त्याने आतून चकचकीत केलेल्या, अ‍ॅल्युमिनियमच्या सिलिंडरमध्ये ठेवले. छिद्रातून बाहेर येणाऱ्या प्रकाशाचे मापन करण्यासाठी प्रकाश संवेदक (फोटोमल्टिप्लायर) ठेवला. त्यानंतर मायमानने या फ्लॅश लॅम्पचा विद्युतदाब वाढवायला सुरुवात केली. विद्युतदाब साडेनऊशे व्होल्टवर पोहोचताच, चांदीच्या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या अपेक्षित लहरलांबीच्या लाल प्रकाशकिरणांची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढली. म्हणजे लेझर किरणांची निर्मिती सुरू झाली होती!_

     _माणकाच्या स्फटिकात असणारे क्रोमियमचे अणू फ्लॅश लॅम्पकडून येणाऱ्या प्रकाशातील लाल रंगाचा प्रकाश शोषून घेऊन उत्तेजित होत होते. त्यानंतर मूळ स्थितीत येताना ते हा लाल रंगाचा प्रकाश उत्सर्जित करत होते. स्फटिकाच्या आतला प्रकाश सर्व बाजूंनी आतल्या आत परावर्तित होत असल्याने, स्फटिकाच्या आतील प्रकाशाची तीव्रता वाढत होती. त्यामुळे क्रोमियमच्या उत्तेजित अणूंची संख्याही वाढून एकाच लहरलांबीचे, तीव्र प्रकाशकिरण- लेझर किरण- मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जित होऊ लागले. या लेझर किरणांचा कालांतराने औद्योगिक तसेच वैद्यकीय क्षेत्रांपासून करमणुकीच्या क्षेत्रांपर्यंत सर्वत्र मुक्तपणे वापर सुरू झाला._


*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, माझी शाळा माझी भाषा मधून_*

छातीत का? धडधडते?

 *_आजची माहिती_*


📒 *_छातीत का धडधडते?_* 📒

***************************


_छातीत डाव्या बाजूला हात लावल्यास हृदयाचे ठोके जाणवतात. हे ठोके स्टेथोस्कोपने स्पष्ट ऐकू येतात. एरवी हृदयाचे ठोके आपल्या दैनंदिन कामात जाणवत नाहीत. श्रमाची कामे केल्यावर, खेळल्यावर, धावल्यावर, भीती वाटल्यावर थोडावेळ धडधडते, श्वसनवेग वाढतो। शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे असे होते. काही वेळातच श्वसनाची गती, हृदयाचे ठोके पूर्ववत होतात. हृदयाच्या कार्याची होणारी अवाजवी जाणीव म्हणजे छातीत धडधडणे (Palpitation), असे म्हणतात._

     _हृदयाच्या कार्यात काही बिघाड असल्यास किंवा एखाद्या वेळेस तणावग्रस्त मानसिकता असेल तर छातीत धडधडते. रक्तक्षय, बेरीबेरी, हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयातले कर्णिकांचे वाढलेले वा गतिमान ठोके किंवा नाडीचा वाढलेला दर, तणावग्रस्त मन, काही प्रकारचे कर्करोग या सर्वांमध्ये छातीत धडधडते. छातीत धडधडणे हा रोग नाही, ते रोगांचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याचे कारण शोधून त्या रोगावर उपचार केल्यास हा त्रास कमी होतो. साधारणतः भीती वाटल्यावर, खेळल्यावर, दचकल्यास तेवढ्यापुरते छातीत धडधडते. अशा धडधडण्याची काळजी करण्याची गरज नाही. ही धडधड थोड्याच वेळात कमी होते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

डायलीसिस म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


📙 *_डायलिसिस म्हणजे काय ?_* 📙 

*******************************

_मूत्रपिंडाच्या विकाराने पीडित रुग्णांच्या बाबतीत अमक्या अमक्या व्यक्तीस डायलिसिसवर ठेवले आहे, असे बोलणे आपण ऐकतो. डायलिसिस म्हणजे काय करत असतील, हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला मूत्रपिंडाचे कार्य काय आहे ते बघावे लागेल. मूत्रपिंडाचे कार्य म्हणजे शरीरातील क्षार, पाणी यांचा समतोल कायम राखणे व शरीरात तयार होणार टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकणे. सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम, तसेच पाणी यांचे शरीरातील प्रमाण योग्य पातळीवर ठेवण्यासाठी मुत्रपिंड कार्यरत राहणे महत्त्वाचे असते. टाकाऊ पदार्थांमध्ये युरियाचा समावेश होतो. सर्वसामान्यपणे आपल्या रक्तात १५ ते ४० मिलीग्रॅम प्रति १०० मिली इतका युरिया असतो. दोन्ही मुत्रपिंडे आजारामुळे वा इतर कोणत्याही कारणाने निकामी झाली तर युरियाचे रक्तातील प्रमाण वाढते. हे प्रमाण खूप वाढल्यास युरिया मेंदूत जमा होऊ लागतो. उपचार न केल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो व पुढे त्याचा मृत्यूही होऊ शकतो._

     _मूत्रपिंडाच्या कार्याला मानवाने शोधलेला पर्याय म्हणजे डायलिसिस. रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी विशिष्ट द्रव वापरला जातो. डायलिसिसचे २ प्रकार आहेत. एक म्हणजे पोटातील आवरणाच्या पोकळीत डायलिसिसचा द्रव २० मिनिटे ते १ तास ठेवतात. या काळात पोटातील आवरणात रक्तातील टाकाऊ पदार्थ या द्रवात मिसळले जातात. नंतर हा द्रव काढून टाकला जातो. ही क्रिया ३० ते ४० वेळा केली जाते. या प्रक्रियेला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात. दुसऱ्या पद्धतीत शरीरातील रक्ताचे कृत्रिम किडनी म्हणजे यांत्रिक उपकरणाद्वारे शुद्धीकरण केले जाते. शुद्ध झालेले रक्त परत शरीरात सोडले जाते. याला हिमोडायलिसिस म्हणतात. डायलिसिसमुळे मुत्रपिंडाचे गंभीर रोग झालेल्या रुग्णांना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हे वरदानच आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...